जलालाबाद - अफगाणिस्तानातील जलालाबाद शहरातील भारतीय वाणिज्य कार्यालयाजवळ आज कमी शक्तिशाली बॉंबचा स्फोट झाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. अफगाणिस्तानातील भारताशी संबंधित ठिकाणांवर हल्ल्यांचे सत्र सुरूच आहे.
कचऱ्याच्या पिशवीत ठेवलेल्या कमी शक्तिशाली बॉंबचा स्फोट झाला, अशी माहिती भारतीय दूतावासातील सूत्रांनी दिली. या स्फोटात कोणीही जखमी झालेले नाही असे सांगण्यात आले. जलालाबाद येथील भारतीय वाणिज्य कार्यालयापासून अवघ्या दोनशे मीटर अंतरावर मोठ्या प्रमाणात बॉंब आणि शस्त्रास्त्रांचा साठा आढळून आला आहे.
जलालाबाद येथील भारतीय वाणिज्य कार्यालयाच्या परिसरातच पाकिस्तान आणि इराणची वाणिज्य कार्यालयेही आहेत. आज झालेल्या स्फोटात भारतीय वाणिज्य कार्यालय लक्ष्य करण्यात आले नव्हते, असे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते विकास स्वरूप यांनी सांगितले. या स्फोटात कोणाला लक्ष्य केले होते ते अद्याप समजले नसले तरी स्फोट झाला तेव्हा पोलिसांच्या वाहनांचा ताफा या परिसरातून जात होता, अशी माहिती अफगाणिस्तानच्या नंगरहार प्रांताच्या राज्यपालांच्या प्रवक्त्याने दिली. कचऱ्याच्या पिशवीत बॉंब लपविण्यात आला होता, असेही या प्रवक्त्याने स्पष्ट केले. आजच्या हल्ल्याची जबाबदारी कुठल्याही संघटनेने स्वीकारलेली नाही.
मागील काही दिवसांपासून अफगाणिस्तानातील भारताशी संबंधित कार्यालयावर हल्ल्यांचे सत्र सुरू आहे. मजार-ए-शरीफ येथील भारताच्या वाणिज्य कार्यालयावर शनिवारी दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. जलालाबाद येथील भारताच्या वाणिज्य कार्यालयावरही काही दिवसांपूर्वीच दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अफगाणिस्तान दौऱ्याला आठ दिवस पूर्ण होत नाहीत तोच दहशतवाद्यांनी अनेक ठिकाणांना लक्ष्य केले आहे.
[वृत्तसंस्था]
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा