नाशिक : मागील 40 वर्षांपासून "वन रॅंक वन पेन्शन‘ निर्णय लागू करण्याच्या निर्णयासाठी भारतीय माजी सैनिकांच्या संघटनेतर्फे नवी दिल्ली येथील जंतर-मंतर या ठिकाणी महारॅली काढण्यात आली. रॅलीस नाशिक येथील माजी सैनिक संघटनेतर्फे हुतात्मा स्मारक ते गोल्फ क्लबदरम्यान रॅली काढत पाठिंबा दर्शविण्यात आला.
यूपीए सरकारने वन रॅंक वन पेन्शन निर्णय मंजूर केला होता. मात्र त्यानंतर मोदी सरकारने सत्तेत येऊन आठ माहिने झाले तरी हा निर्णय लागू केला नाही. त्यामुळे माजी सैनिकांमध्ये संशयाचे वातावरण निर्माण झाले. केंद्र सरकारने चालढकलीचे धोरण स्वीकरल्यामुळे माजी सैनिकांतर्फे आज महारॅली काढण्यात आली. नाशिकमध्ये काढण्यात आलेल्या रॅलीत सुमारे 300 माजी सैनिक सहभागी झाले होते. गोल्फ मैदानावर संसदीय संरक्षण समितीचे सदस्य खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांना निवेदन देण्यात आले. सैनिकांची मागणी आपण संसदेत आणि संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांच्यापुढे ठेवू, असे आश्वासन त्यांनी दिले. रॅलीत नाशिक येथील मुख्य संयोजक अविनाश कुलकर्णी, पी. एम. सैनी, विंग कमांडर हनवते (माजी), उदय ठाकरे, एचएएलचे आप्पा जाधव, डी. के.
पाटील, राजेंद्र भावसार, पी. ए. चौधरी, श्री. बस्ते यांच्यासह मोठ्या संख्येने माजी सैनिक सहभागी झाले होते.