बीजिंग - पठाणकोट येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (एनएसए) अजित दोवल यांचा चीन दौरा रद्द करण्यात आल्याची घोषणा आज (सोमवार) करण्यात आली. दोवल हे उद्यापासून (मंगळवार) चीनच्या उच्चस्तरीय अधिकाऱ्यांशी महत्त्वपूर्ण चर्चेस प्रारंभ करणार होते. मात्र या दहशतवादी हल्ल्यामुळे दोवल यांचा दौरा पुढे ढकलण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे.
दोवल हे भारत व चीनमधील सीमाप्रश्नावर चर्चा करण्यासाठी नेमण्यात आलेले विशेष प्रतिनिधीही आहेत. यासंदर्भातील चर्चेच्या आत्तापर्यंत 18 फेऱ्या झाल्या आहेत. भारत व चीनमधील सीमाप्रश्न आणि अन्य महत्त्वपूर्ण विषयांवर चीनचे सुरक्षा सल्लागार यांग जिएची यांच्याशी चर्चा करण्यासाठी दोवल यांच्या दोन दिवसीय दौऱ्याचे नियोजन करण्यात आले होते. या दौऱ्यादरम्यान दोवल चीनचे पंतप्रधान ली कशियांग यांचीही भेट घेणार होते.
पठाणकोट हल्ल्यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित दोवाल आणि परराष्ट्र मंत्रालयामधील उच्चस्तरीय अधिकाऱ्यांची पंतप्रधानांच्या निवासस्थानी संवेदनशील बैठक सुरु आहे. एनएसजी आणि लष्कराच्या कमांडोंनी येथील हवाई तळाच्या संपूर्ण परिसराची झाडाझडती सुरू केली असून, दहशतवाद्यांना कोंडीत पकडले असल्याचे पोलिसांनी सांगितले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा