नवी दिल्ली, 2-12-2015 : भारत आणि इस्राएल दरम्यान जलसंपदा व्यवस्थापन आणि विकास सहकार्यासंबंधी सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजूरी देण्यात आली. हे द्विपक्षीय सहकार्य उभय देशांना पाण्याचा कार्यक्षम वापर , सूक्ष्म सिंचन, टाकाऊ पाण्याचा पुनर्वापर, पाण्यातील क्षार काढून जलसंवर्धन पध्दती यासंबंधी लाभदायक ठरणार आहे. या सामंजस्य कराराच्या संदर्भात केल्या जाणाऱ्या उपक्रमांचे निरिक्षण करण्यासाठी एका संयुक्त कार्यकारी गटाची स्थापना करण्यात आली आहे. भारताने यापुर्वीच जलसंपदा व्यवस्थापन आणि विकास सहकार्याच्या क्षेत्रात ऑस्ट्रेलिया, रवांडा, कंबोडिया, इराण, इराक, फिजी, चीन आणि बहरीन यांच्यासोबत करार केला आहे.
पार्श्वभूमी:
धोरण व तांत्रिक कौशल्याची देवाण-घेवाण, प्रशिक्षण अभ्यासक्रम, कार्यशाळा, वैज्ञानिक व तांत्रिक परिषद, तज्ञ विनिमय आणि अभ्यास दौरे यांच्या माध्यमातून जल संसाधन विकास आणि व्यवस्थापनाच्या क्षेत्रात इतर देशांबरोबर द्विपक्षीय सहकार्याचा विचार जल संसाधन, नदी विकास व गंगा पुनरुज्जीवन मंत्रालयातर्फे केला जात आहे. पाण्याचा कार्यक्षम वापर , सूक्ष्म सिंचन, टाकाऊ पाण्याचा पुनर्वापर, अक्षारीकरण, सच्छिद्र पुनर्भरण इत्यादीमध्ये इस्राएलचे यश लक्षात घेऊन त्यांच्या अनुभव आणि कौशल्याचा लाभ घेण्यासाठी हा करार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा