नवी दिल्ली, (2-12-2015) : फरिदाबाद येथे जैवतंत्रज्ञानासाठी प्रादेशिक केंद्र स्थापन करण्यासाठी संसदेत विधेयक सादर करायला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. या केंद्राला वैधानिक दर्जा पुरवणे हा या विधेयकाचा हेतू आहे जेणेकरुन स्वायत्त संस्था म्हणून या केंद्राला स्वतंत्रपणे काम करता यावे तसेच जैवतंत्रज्ञानामध्ये शिक्षण, प्रशिक्षण आणि संशोधन क्षेत्रात महत्त्वाची राष्ट्रीय संस्था म्हणून काम करता यावे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या मंजुरीनंतर भारत सरकारच्या कार्यकारी आदेशानुसार नोव्हेंबर 2008 मध्ये हे केंद्र आधीच स्थापन करण्यात आले आहे. हे केंद्र एनसीआर बायोटेक सायन्स क्लस्टर, फरिदाबाद येथे सध्या कार्यरत आहे.
उद्योगांना पूरक शैक्षणिक उपक्रम, जैवऔषध शोध विज्ञान, नॅनो विज्ञान व औषध विज्ञान, जैवअभियांत्रिकी, बौध्दिक संपदा, आणि कुशल मनुष्यबळाचा तुटवडा यावर मात करणे यावर भर देणारे, जैवतंत्रज्ञानात आंतरशाखीय शिक्षण, प्रशिक्षण संशोधन पुरवणारे हे प्रादेशिक केंद्र आहे. या क्षेत्रात लागणारे मनुष्यबळ पुरवणारे सार्क देशांमधले, आशियामधले हे केंद्र ठरेल.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा