Divya Marathi : Solapur
यशवंत पोपळे । सोलापूर
क्षेपणास्त्र तंत्रज्ञान प्रणालीचे प्रशिक्षण उत्तमरीत्या पूर्ण केल्याबद्दल अक्कलकोट येथील भीमाशंकर स्वामीनाथ गुरव यांना इंग्लंडच्या ‘क्रॅनफिल्ड युनिव्हर्सिटी : डिफेन्स अकॅडमी ऑफ द युनायटेड किंगडम, स्वींडन’ या विद्यापीठाने सुवर्णपदक आणि ‘बेस्ट स्टुडंट ऑफ द इयर’ हा पुरस्कार जाहीर केला आहे. पुढील वर्षात २०१६ मध्ये पदवीदान समारंभात त्यांचा गौरव करण्यात येणार आहे. ‘मास्टर ऑफ सायन्स इन गायडेड वेपन्स’ हे प्रशिक्षण त्यांनी पूर्ण केले.
पुण्यातील संरक्षण मंत्रालयाच्या आयुध अनुसंधान आणि विकास संस्थापन (डिआरडिओ) संस्थेत सन २००६ पासून भीमाशंकर हे सहाय्यक निदेशक (संशोधक) पदावर कार्यरत आहेत. क्षेपणास्त्र (मिसाईल), प्रक्षेपणास्त्र (रॉकेट) आणि रायफल्सच्या आधुनिक संशोधन प्रकल्पावर संशोधक म्हणून त्यांची नियुक्ती आहे. केरळ राज्यातील कालिकतच्या ‘नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी’ या संस्थेतून ‘बीटेक’चा अभ्यासक्रम पूर्ण करत असताना त्यांची कॅम्पस इंटरव्ह्यूमध्ये या संस्थेत निवड झाली होती. त्यांचे शिक्षण अक्कलकोट येथील शारदामाता इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये (दहावी : २०००) आणि ९५ टक्के गुणांसह संगमेश्वर महाविद्यालयात (बारावी : २००२) झाले.
भीमाशंकर गुरव म्हणाले, जगात क्षेपणास्त्र तंत्रज्ञान प्रणालीचे प्रशिक्षण देणाऱ्या दोनच संस्था आहेत. लंडन शहरापासून ६० मैल अंतरावरील स्वीडन येथील ‘क्रॅनफिल्ड युनिव्हर्सिटी : डिफेन्स अकॅडमी ऑफ द युनायटेड किंगडम’ आणि अमेरिकेतील ‘नेव्हल पोस्ट ग्रॅज्युएट स्कूल, मॉन्टेरिओ, कॅलिफोर्निया’ ही संस्था.
या प्रशिक्षणासाठी जगातून तेरा जणांची निवड झाली. भारतातून तिघांची निवड झाली. तीन भारतीयांसह अमेरिका, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, सिंगापूर, इटली या देशातून प्रत्येकी एक आणि ब्रिटनमधून पाच अशा एकूण १३ प्रशिणार्थींची जगभरातून निवड झाली होती. दैनंदिन कामातील कौशल्य विकास, एक लेखी परीक्षा आणि तीन मुलाखतींच्या निकषांवर अशा प्रशिक्षणासाठी निवड केली जाते.
श्री गुरव म्हणाले, भारतातून अशा क्षेपणास्त्र तंत्रज्ञान प्रणाली प्रशिक्षणासाठी निवड होणारी आमची पहिलीच तुकडी होती. इंग्लंडमधील इंटर नॅशनल डिफेन्स ट्रेनिंग इन्स्टिट्यूटमार्फत प्रशिक्षणासाठी निवड होते. पूर्वी केवळ ‘नाटो’ सदस्य राष्ट्रांतील सरकारी आयुध संशोधन संस्थामधील संशोधकांची प्रशिक्षणासाठी निवड होत असे. मात्र यावेळी भारतातील तीन संशोधकांना अशा प्रशिक्षणाची पहिल्यांदाच संधी मिळाली. ऑगस्ट २०१४ ते जुलै २०१५ असा प्रशिक्षण कालावधी होता.
या प्रशिक्षणाने भारताच्या संरक्षणासाठी स्वबनावटीचे अत्याधुनिक क्षेपणास्त्र बनवण्याचा मार्ग सुकर होणार आहे. क्षेपणास्त्र तंत्रज्ञान प्रणाली निर्मितीवर सध्या होणारा खर्च मोठा आहे. कमीत कमी खर्चात क्षेपणास्त्र बनविणे हाच प्रशिक्षणाचा मुख्य हेतू होता. अत्याधुनिक क्षेपणास्त्रांचा पुस्तकी ज्ञानापेक्षा प्रत्यक्ष निर्मिती तंत्रज्ञानाची व संशोधनाची माहिती प्रशिणार्थींना मिळाली. त्यामुळे क्षेपणास्त्र तंत्रज्ञान प्रणालीच्या संशोधन कार्यात भारताची स्वावलंबनाकडे निश्चीतच वाटचाल होईल. सर्व प्रशिणार्थींना प्रशिक्षण कालावधीत फ्रान्समधील रॉक्सेल आणि एसएजीइएम इंग्लंडमधील एमबीडीए या क्षेपणास्त्र बनविणाऱ्या कंपन्यांना भेटी देऊन थेट निर्मिती तंत्रज्ञानाचा अभ्यास करता आला, असे श्री. गुरव म्हणाले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा