श्रीनगर: कुपवाड्यातल्या हाजीनाका जंगलातल्या डोंगररांगांमध्ये ते घुसले होते. सोबत होता अमाप दारुगोळा आणि शस्त्रास्त्रांचा खच. काही तरी मोठा प्लॅन होता. काहीच दिवसांपूर्वी अतिरेक्यांच्या याच टोळीनं लष्कराच्या ताफ्यावर हल्ला केला होता. त्यानंतर सुमारे आठवडाभर हे अतिरेकी सुरक्षा यंत्रणांना गुंगारा देत होते.
अखेर 41 राष्ट्रीय रायफल्सची बटालियन सज्ज झाली. ज्याचं नेतृत्त्व करत होते. कर्नल संतोष महाडिक. अतिरेक्यांचा खातमा करण्याच्याउद्देशानं संतोष आणि त्यांच्या बटालियननं हाजीनाका जंगलात प्रवेश केला. खड्या पहाड्या, लपण्यासाठी मुबलक जागा आणि दाट जंगल. सारं काही अतिरेक्यांसाठी परफेक्ट होतं. जणू त्यांचंच बॅटलग्राऊंड.
त्यामुळे आधी अतिरेक्यांना शोधणं आणि त्यानंतर त्यांच्या खातमा करणं, असं दुहेरी आव्हान संतोष यांच्या खांद्यावर होतं. सुमारे दीड दिवसांच्या शोधमोहिमेनंतर अतिरेक्यांचा ठावठिकाणा लागला आणि संतोष महाडिकांची 41 राष्ट्रीय रायफल्स अतिरेक्यांवर जणू तुटून पडली.
दोन्ही बाजूने तुफान धुमश्चक्री, आवाज फक्त गोळ्यांचा. संतोष महाडिकांच्या नेतृत्त्वात या जाँबाज टीमनं. अतिरेक्यांना काढता पाय घेण्यास भाग पाडलं. चकमक सुरु होती अतिरेकी मागे सरकत होते. अतिरेक्यांचा खातमा नजरेसमोर होता पण त्याच वेळी अघटित घडलं. मागे सरलेल्या अतिरेक्यांनी एकाच ठिकाणी दबा धरून 41 राष्ट्रीय रायफल्सवर बेछूट गोळीबार सुरु केला.
टीमला लीड करणारे संतोष महाडिक सर्वात पुढे होते. अतिरेकी वरचढ ठरत असल्याचं पाहून संतोष यांनी निधड्या छातीनं अतिरेक्यांना आव्हान दिलं आणि बेछूट गोळीबार सुरु केला. पण त्याचवेळी अतिरेक्यांच्या गोळ्यांनी संतोष यांचा वेध घेतला.
संतोष महाडिक कोसळले. पण त्याचवेळी 41 राष्ट्रीय रायफल्सनं गोळ्यांचा पाऊस पाडला. अतिरेकी बिथरले आणि त्यांनी काढता पाय घेतला. संतोष महाडिक निपचित पडले होते. जवानांनी आपल्या म्होरक्याला वाचवण्यासाठी प्रयत्नांची शर्थ केली. लष्कराच्या हेलिकॉप्टरनं संतोष यांना रुग्णालयात धाडण्यात आलं. पण वेळ निघून गेली होती.
बालपणापासून देशासाठी एकदा मरायचंय. असं म्हणणारा संतोष आपल्या मातृभूमिसाठी धारातीर्थी पडला. त्याचं स्वप्न पूर्ण झालं. त्याला देशासाठी मरायचं होतं. आपल्या देशालाही असे वेडे तरुण मिळतात जे हसत हसत मृत्यूला कवटाळतात. संतोष, देशासाठी धारातीर्थी पडल्यानं तू खुश असशीलही. पण आम्ही आज उद्विग्न आहोत तुला गमावल्यानं एका निडर लीडरला गमावल्यानं.
भारतीय सैनिक
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा