मुंबई, 16-3-2017 : मुंबईतील वेलिंगकर संस्थेच्या ‘वी स्कूल’च्या पदवीदान समारंभाला केंद्रीय रस्ते परिवहन, राष्ट्रीय महामार्ग आणि नौवहन मंत्री नितीन गडकरी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. संस्थेच्या पदवीधर विद्यार्थ्यांना यावेळी त्यांनी संबोधित केले. पैसे कमावणे दुय्यम असून, आयुष्याचे ध्येय पैसा कमावणे इतकेच असू नये. विद्यार्थ्यांनी नाविन्य, संशोधन आणि दृष्टीकोनाला प्राधान्य दिले पाहिजे, असे ते म्हणाले.
नवीन तंत्रज्ञान आणि शोधांच्या माध्यमातून समाजात वेगाने बदल होत आहेत. मात्र आर्थिक बलाशिवाय देशाला आकार देणे अशक्य आहे, त्यामुळे विद्यार्थ्यांनी ज्ञानाचे संपत्तीत रुपांतर करण्याच्या कामी इंजिनाची भूमिका बजावावी, असे आवाहन गडकरी यांनी केले. तळागाळातील शाळांचा आणि तेथील विद्यार्थ्यांचा दाखला त्यांनी दिला. विद्यार्थी, शिक्षक, शालेय वातावरण तसेच अभ्यासाच्या अनुपलब्धतेमुळे ग्रामीण भागातील शाळांची स्थिती बिकट असल्याचे त्यांनी सांगितले. त्याचवेळी जागतिक मानक प्राप्त वेलिंगकर संस्थेचे त्यांनी कौतुक केले.
उद्योग आणि राजकारणात मानवी नाती ही सर्वात मोठी क्षमता असते. वेगाने निर्णय घेणे आवश्यक असते. गोव्यात निवडणुकांनंतर राज्यपालांसमोर बहुमत सिद्ध करण्यासाठी किती वेगाने घडामोडी झाल्या, याचे उदाहरणही गडकरी यांनी दिले.
मुंबईतील वांद्रे-वरळी सागरीसेतु, 52 पुल आणि 55 उड्डाण पुल बांधण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून निधी प्राप्त झाला होता. ही सर्व कामे निर्धारित तारखेपूर्वी पूर्ण करण्यात आली, किमान खर्चात त्यांचे बांधकाम झाले. परिणामी, वितरीत निधीतील काही कोटी रुपयांची बचत झाली आणि ते पैसे इतर कामी वापरता आले. तीव्र राजकीय इच्छाशक्ती, योग्य दृष्टीकोन, जलद निर्णय आणि सांख्यिक कामासाठी वेळेचे योग्य व्यवस्थापन यांची सांगड घालूनच सार्वजनिक कामे केली पाहिजेत, असे ते म्हणाले.
नेतृत्वाचा अभाव, चुकीची आर्थिक धोरणे आणि कुप्रशासन या कारणांमुळे आपला देश हा गरीब लोकसंख्येचा श्रीमंत देश आहे. विद्यार्थ्यांनी गरीबांप्रती सहानुभूतीची भावना बाळगावी, असे आवाहन त्यांनी केले. समाजात काम करतांना कर्तव्य आणि प्रशासन यांच्यात अडथळे आल्यास नियम मोडू नका, मात्र लोक हितासाठी ते वाकवता येतील, असे त्यांनी सांगितले.
ज्येष्ठ पत्रकार अतुल मारपकवार, वेलिंगकर संस्थेचे प्राध्यापक प्रा.उदय साळुंखे, माधुरीताई मिसाळ यांच्यासह अनेक विद्यार्थी आणि पालकही या समारंभाला उपस्थित होते.
PIB
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा