मुंबई - मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित यांची सोमवारी जामीनावर सुटका करण्यात आली आहे. कर्नल पुरोहित यांना सुप्रीम कोर्टाने 9 वर्षांनी जामीन मंजूर केला. दरम्यान, कर्नल पुरोहित पुन्हा लष्करात रुजु होणार आहेत. मात्र त्यासाठी त्यांना न्यायालयाच्या आदेशाची प्रत लष्कराला द्यावी लागणार आहे.
सप्टेंबर 2008 मधील मालेगाव स्फोटानंतर कर्नल पुरोहित यांना लष्करी सेवेतून निलंबित करण्यात आले होते. मात्र दोष सिद्ध न झाल्यामुळे त्यांना आजही 75 टक्के पगार आणि भत्ते मिळतात. पुरोहित हे 1994 साली सैन्यामध्ये रुजू झाले. मराठा लाईट इन्फ्रंट्रीमधून त्यांना देशसेवेची संधी मिळाली. चेन्नईतल्या प्रशिक्षणानंतर त्यांची पहिली पोस्टिंग थेट काश्मीरमध्ये करण्यात आली. पण आजारी पडल्याने त्यांना दहशतवादविरोधी पथकाच्या गुप्तचर खात्यात पाठवण्यात आले होते.
प्रसाद पुरोहित यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, माझा न्यायालयीन प्रक्रियेवर पूर्ण विश्वास असून न्यायालयाने दिलेल्या निर्णयाने ही आनंदी आहे. आता मला माझ्या कुटुंबाला भेटायचे आहे. मला दोन कुटुंब आहेत. एक म्हणजे माझी मातृभूमी म्हणजे माझी लष्करी सेवा आणि दुसरे म्हणजे माझे स्वत:चे कुटुंब, माझी आई, बहीण, बायको, दोन मुले, असे त्यांनी सांगितले.
मात्र 2008 च्या मालेगाव स्फोटाचे धागेदोरे कर्नल पुरोहितांकडे पोहोचल्यानंतर, त्यांना अटक करण्यात आली. मध्य प्रदेशातल्या पंचमढीतल्या लष्करी प्रशिक्षण केंद्रातून त्यांना ताब्यात घेण्यात आलं होतं. अरबी शिकण्यासाठी ते तिकडे गेले होते. पण ते त्यावेळी मुंबईतील कुलाबा आर्मी हेडक्वॉर्टरमध्ये कार्यरत होते. त्यामुळे कर्नल पुरोहित हे इथूनच पुन्हा ड्युटी जॉईन करण्याची शक्यता आहे.
तांत्रिकदृष्ट्या कर्नल पुरोहित हे आजही लष्करी सेवेत कार्यरत आहेत. त्यामुळे ते पुन्हा रुजु झाल्यानंतर त्यांची बदली होण्याची चिन्हे आहेत. मात्र त्यांना रुजु करुन घ्यायचे की निलंबितच ठेवायचे, याबाबतचा निर्णय त्यांचा कमांडिंग ऑफिसर घेतील, अशी माहिती सुत्रांनी दिली
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा