काय आहे ‘लाय-फाय’?
सभोवताली असलेल्या प्रकाशाच्या माध्यमातून डेटा ट्रान्स्फर करण्याच्या पद्धतीला ‘लाय-फाय’ म्हणतात. ही पद्धत ‘वाय-फाय’प्रमाणेच काम करते. या पद्धतीत एलईडीद्वारे (लाइट इमिटिंग डायोड) पडणाऱ्या प्रकाशाच्या माध्यमातून माहितीची देवाणघेवाण होते. त्यासाठी एलईडी बल्बमध्ये छोटी चीप बसविण्यात येते. या चीपद्वारे डेटा बायनरीमधून डिजिटल पद्धतीत बदलला जातो. त्यासाठी आवश्यकतेप्रमाणे प्रकाशाची तीव्रता कमी-जास्त करण्यात येते. मात्र ही तीव्रता मानवी डोळ्यांना जाणवत नाही. एलईडी बल्बच्या प्रकाशातून मिळणारी माहिती डिव्हाईसमधील फोटोसेप्टरद्वारे स्वीकारली जाते, तसेच पाठविलीही जाते. एलईडीच्या एका बल्बमध्ये प्रतिसेकंद १.७ जीबी एवढा डेटा ट्रान्स्फर करण्याची क्षमता असून, ती प्रतिसेकंद १० जीबीपर्यंत वाढविता येते, असा दावा करण्यात येत आहे. ‘वाय-फाय’च्या तुलनेत ही पद्धत अधिक प्रभावी असून, एलईडीच्या प्रकाशात कोणत्याही अडथळ्याविना डेटा ट्रान्स्फर करता येईल, असे संशोधकांचे मत आहे.
‘लाय-फाय’समोरील आव्हाने
‘लाय-फाय’समोरील प्रमुख आव्हान म्हणजे डेटा ट्रान्स्फर करताना यूझर पुरेशा प्रकाशातच असणे आवश्यक आहे. प्रकाशाच्या स्रोतापासून थोडी हालचाल झाल्यास ‘डेटा ट्रान्स्फर’ प्रक्रियेत अडथळा निर्माण होण्याची शक्यता आहे. अर्थातच, अंधारात हे तंत्रज्ञान निरुपयोगी आहे. या तंत्राचे ब्रिटनमधील जनक, एडिनबरो विद्यापीठातील प्राध्यापक हेराल्ड हास यांच्या मते आपल्या सभोवताली पुरेसा प्रकाश उपलब्ध असल्याने हे तंत्र प्रभावी ठरेल. हास यांनी ‘डी-लाईट’ प्रकल्पांतर्गत ‘लाय-फाय’वर संशोधन केले आहे. या प्रकल्पांतर्गत ‘व्हिजिबल लाईट कम्युनिकेशन’चा अभ्यास करण्यात आला आणि त्यातून हे तंत्र समोर आले.
‘लाय-फाय’चे भवितव्य
इ.स. २०१९ पर्यंत जगभरात स्मार्टफोन्स, लॅपटॉप्ससारखे शंभर कोटींपेक्षा अधिक डिव्हाईसेस असतील. त्यामुळे डेटा ट्रान्स्फर करण्यासाठीची वर्तमान पद्धत त्यावेळी अपुरी ठरेल. त्यासाठी आतापासूनच नव्या पर्यायांचा शोध घेण्यात येत आहे. त्यामुळे २०१३ ते २०१८ दरम्यान ‘लाय-फाय’ च्या व्यवसायात दरवर्षी ८२ टक्क्यांची वाढ होण्याची शक्यता आहे. तसेच २०१८ पर्यंत या व्यवसायाची वार्षिक उलाढाल शंभर कोटी डॉलरच्या पुढे जाण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
- व्यंकटेश कल्याणकर
[ Esakal ]
सोमवार, 9 नोव्हेंबर 2015 - 03:00 AM IST
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा