Pages

पेज

बुधवार, २७ डिसेंबर, २०१७

कुलभूषणला भेटण्याआधी बांगड्या, मंगळसूत्र काढून टाका; पाकचा बेमुर्वतखोरपणा

Kulbhushan Jadhav

नवी दिल्ली : हेरगिरीच्या आरोपाखाली पाकिस्तानमध्ये मृत्युदंडाची शिक्षा सुनावण्यात आलेले भारताचे माजी नौदल अधिकारी कुलभूषण जाधव यांची काल (सोमवार) त्यांच्या आई आणि पत्नीशी भेट झाली. केवळ 40 मिनिटांच्या या भेटीसाठी पाकिस्तानने कुलभूषण यांची आई आणि पत्नी दोघींचाही मानसिक छळ केल्याच्या धक्कादायक घटना समोर येत आहेत. कुलभूषण यांना भेटण्यापूर्वी कुलभूषण यांच्या आई आणि पत्नीला मंगळसूत्र, टिकली आणि बांगड्या काढून टाकण्याचे आदेश पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी दिले होते.

या भेटीनंतर दोघीही लगेचच भारतात परतल्या होत्या. या दोघींनी आज (मंगळवार) परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांची भेट घेतली. या भेटीनंतर परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्‍त्याने यासंदर्भात धक्कादायक माहिती उघड केली.

पाकिस्तानच्या वर्तणुकीची आणखी एक संतापजनक बाब म्हणजे, प्रत्यक्ष भेटीपूर्वी कुलभूषण यांच्या आई आणि पत्नीला कपडे बदलण्यासही स्थानिक अधिकाऱ्यांनी भाग पाडले. त्यांच्या आईची पादत्राणेही पाकिस्तानने काढून घेतली आणि परतताना ही पादत्राणे दिली नाहीत, अशी माहितीही परराष्ट्र मंत्रालयाने दिली. या भेटीचा पाकिस्तानने प्रचंड गवगवा केला आहे. कुलभूषण यांचा एक व्हिडिओही पाकिस्तानने प्रसिद्ध केला आहे. भारताने या व्हिडिओतून दिसणाऱ्या कुलभूषण यांच्या परिस्थितीवरही प्रश्‍नचिन्ह उपस्थित केले.

'कुलभूषण यांच्यावर प्रचंड दडपण असल्याचे यातून स्पष्टपणे जाणवत आहे. या व्हिडिओत त्यांनी पढवलेली उत्तरे दिली आहेत' असे परराष्ट्र मंत्रालयाचे निरीक्षण आहे. या भेटीदरम्यान पाकिस्तानने कुलभूषण आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या भावनांची कदर करण्याइतकीही माणुसकी दाखविली नाही. कुलभूषण यांच्या आईला मराठीत बोलण्यासही पाकिस्तानने मनाई केली. इतकेच नव्हे, तर कुलभूषण यांच्याशी संवाद साधत असताना वारंवार त्यात अडथळे आणण्यात आले. विशेष म्हणजे, कुलभूषण यांच्या कुटुंबीयांबरोबर असलेले भारताचे उपउच्चायुक्त जे. पी. सिंग यांनाही हे संभाषण ऐकू दिले नाही. मात्र, एकूण तीन कॅमेरे लावून पाकिस्तानने ही संपूर्ण भेट रेकॉर्ड केली आहे.

'या भेटीसाठी ठरलेल्या गोष्टी पाकिस्तानने अजिबात पाळल्या नाहीत, असे यातून दिसून येत आहे. या भेटीसाठीचे वातावरण प्रचंड निराशाजनक आणि दडपण आणणारे होते. तरीही कुलभूषण यांच्या कुटुंबीयांनी ही परिस्थिती खूपच परिपक्वपणे हाताळली', असेही परराष्ट्र मंत्रालयातर्फे सांगण्यात आले.

 

वृत्तसंस्था मंगळवार, 26 डिसेंबर 2017

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा