Pages

पेज

सोमवार, ४ जानेवारी, २०१६

बलिदान केलेल्या सुपुत्राचा अभिमान: वीरपिता

सोमवार, 4 जानेवारी 2016 - 02:04 PM IST

अंबाला - पठाणकोट येथील भारतीय हवाई दलाच्या तळावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यावेळी दहशतवाद्यांचा सामना करताना हुतात्मा झालेल्या माझ्या मुलाचा मला अभिमान आहे, अशी भावना सुचा सिंग यांनी आज (सोमवार) व्यक्त केली. सुचा सिंग यांचा सुपुत्र व भारतीय लष्करामधील गरुड कमांडो दलाचा जवान गुरसेवक सिंग हा पठाणकोट येथील हल्ल्यादरम्यान हुतात्मा झाल्याचे निष्पन्न झाले आहे. गुरसेवक याचे अवघ्या दिड महिन्यापूर्वी लग्न झाले होते. देशासाठी बलिदान केलेल्या आपल्या पुत्राचा सार्थ अभिमान असल्याचे सिंग यांनी यावेळी सांगितले.
"माझा मुलगा हा देशाची सेवा करण्यासाठी हवाई दलामध्ये दाखल झाला होता. त्याने आज त्याचे कर्तव्य पूर्ण केले आहे. मला त्याचा अभिमान आहे. अर्थात, आम्हाला त्याच्या जाण्याने दु:खही झाले आहे. गुरसेवक याच्यापुढे थोर देशभक्‍त व क्रांतिकारक भगत सिंह यांचा आदर्श होता,‘‘ असे शेतकरी असलेल्या सिंग यांनी सांगितले. सिंग यांचा मोठा मुलगाही लष्करामध्ये आहे. सिंग कुटूंब हे मुळचे अंबालामधील गर्नाला गावामधील आहे.
हरयानाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांनी गुरसेवकच्या हौतात्म्याबद्दल शोक व्यक्‍त करत गुरसेवक याच्या आप्तस्वकीयांसाठी 20 लाख रुपयांच्या मदतनिधीची घोषणा केली आहे. पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर गुरसेवक हा सुमारे सहा वर्षांपूर्वी भारतीय हवाई दलात दाखल झाला होता.

[वृत्तसंस्था]

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा