Pages

पेज

रविवार, ८ नोव्हेंबर, २०१५

जनजागरण फेरीने गडहिंग्लज दुमदुमले

केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाअंतर्गत पुणे पत्र सूचना कार्यालयाच्या वतीने तसेच मंत्रालयाच्या इतर विविध विभागांच्या सहकार्याने, गडहिंग्लज येथे दिनांक ६ ते ८ नोव्हेंबर २०१५ दरम्यान लोक माहिती अभियानाचे आयोजन करण्यात आले. त्यानिमित्ताने कोल्हापूरच्या क्षेत्रीय प्रचार कार्यालयाच्या वतीने जनजागरण फेरीचे आयोज करण्यात आले होते.

येथील महाराणी राधाबाई माध्यमिक व उच्च माध्यमिक प्रशालेच्या प्रांगणातून सकाळी ९ वाजता या फेरीस प्रारंभ झाला. या फेरीस, कोल्हापूरचे प्रांताधिकारी डॉ. कुणाल खेमनार, गडहिंग्लजचे तहसीलदार हणमंत पाटील व पुणे पत्र सूचना कार्यालयाच्या संचालिका अल्पना पंत-शर्मा यांनी हिरवा झेंडा दाखवून शुभारंभ केला. यावेळी ए.पी.आय. श्रीमती शेळके, मुंबई पत्र सूचना कार्यालयाचे माध्यम अधिकारी सय्यद अख्तर, कोल्हापूर क्षेत्रीय प्रचार कार्यालयाचे सहाय्यक प्रमोद खंडागळे, पणजी क्षेत्रीय प्रचार कार्यालयाचे प्रदीप पवार, पुणे पत्र सूचना कार्यालयाच्या  अधिकारी शिल्पा पोफळे, एम. आर. हायस्कूलचे प्राचार्य डॉ. जी. बी. कळमकर, साधना महाविद्यालयाचे प्राचार्य जी. एस. शिंदे, जीवन शिक्षा विद्यामंदिर, वडरगेचे मुख्याध्यापक सुहास शिंत्रे आदि मान्यवरांची उपस्थिती होती.
 
जीवन शिक्षा विद्यामंदिर, वडरगे प्रशालेच्या विद्यार्थ्यांच्या झांज पथकाच्या गजरात ही फेरी एम. आर. हायस्कूलच्या प्रांगणातून बुरुड गल्ली-शिवाजी चौक-बस स्थानक मार्गे पुन्हा एम. आर. हायस्कूल येथे आली. यावेळी विद्यार्थ्यांच्या हातामध्ये बेटी बचाओ-बेटी पढाओ, मुलापेक्षा मुलगी बरी; प्रकाश देते दोन्ही घरी, मंत्र आहे नवयुगाचा; मुलींना हक्क प्रगतीचा, पेड लागाओ-देश बचाओ, स्वच्छ भारत-स्वस्थ भारत आदि घोषवाक्यांचे फलक दिसत होते. यावेळी गडहिंग्लज मधील नागरिक कुतूहलाने या फेरीकडे पाहत होते.
PIB मुंबई, 6-11-2015

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा