Pages

पेज

मंगळवार, २४ नोव्हेंबर, २०१५

कर्नल संतोष महाडिक ह्यांच्या अंत्यसंस्कार प्रसंगी विंग कमांडर मनीष यांनी व्यक्त केलेल्या भावना

कर्नल संतोष महाडिक ह्यांच्या अंत्यसंस्कार प्रसंगी विंग कमांडर मनीष यांनी व्यक्त केलेल्या भावना

भावानुवाद –अंबर कर्वे

मी संभ्रमात आहे,
हा निरोप समारंभ आहे का?
स्वागत समारोह आहे ?
याला दुखःद शेवट म्हणावा का?
एक आश्वासक सुरुवात ?

गावात सगळीकडे त्या सैनिकाचे फोटो असलेले फलक झळकत होते.
रस्ते रांगोळ्या आणि फुलांनी सजलेले होते.
पाच हजार लोक,हजारो किलो फुले, कडक सैनिकी गणवेषातले आर्मीचे जवान!

आणि एक मृतदेह ...

मी संभ्रमात आहे,
हा नेमका निरोप समारंभ आहे का?
स्वागत समारंभ आहे ?

आर्मीची सजवलेली गाडी येते, तिरंग्यात लपेटलेले कॉफीन, स्पेशल फोर्सच्या जवानांच्या बळकट खांद्यांवर विश्वासाने सोपवले जाते. हजर असलेला प्रत्येकजण त्या 'कॉफीन ला स्पर्श करण्यासाठी, खांदा देण्यासाठी धडपडत असतो. अर्थात प्रत्येकजण तेवढा सुदैवी नसतो.

आर्मीच्या सैनिकांची शिस्तबद्ध पावले टाकत पुढे सरकतात. कॉफीन जड झालं आहे.भावना तर थोड्या जास्तच ...

मी संचलन करत मागे वळतो...
तिथे प्रचंड गर्दी आहे. लोकं पाण्याच्या टाकीवर, घरांच्या छपरांवर चढून बघत आहेत.

अरे, असं तर मी क्रिकेट मॅचच्या अन्  हिंदी सिनेमाच्या शुटींगच्या प्रसंगी बघतो ना ?
तसं तर इथं काहीच नाहीये..

मी संभ्रमात आहे ...
मला कॅमेरे दिसतायत खूप, काहींना परफेक्ट अँगल हवा आहे, काहीजण मुलाखती घेण्याच्या प्रयत्नात आहेत.
त्यांच्या पुढेच काही सुन्न झालेल्या लोकांचा घोळका उभा दिसतो आहे.

ही ब्रेकिंग न्यूज आहे का?
कोलमडून तुटलेलं एक घर ?

मी संभ्रमात आहे ...

त्वेषाने पाकिस्तान मुर्दाबादच्या बरोबरच “भारतमाता कि जय” च्या घोषणा जोरात दिल्या जात आहेत.
मी तर इथं स्वतःबरोबरच्याच युद्धात आहे,
खात्रीनं माझ्यासोबतचे बरेचसे लोकही ...

त्याच्या बायकोसमोर कॉफिन ठेवले जाते.
ती विमनस्क अवस्थेत ते कॉफिन घट्ट धरते,जसे एखाद्या मातेने आपल्या बालकाला बिलगावे तसे.
’त्याची’ दहा वर्षांची मुलगी येवून सलाम करते...
कडक सलाम ...

गर्दी अभिमानाने तिच्याकडे बघतच राहते...
माझे डोळे पाणावतात...शेकडो आया शांतपणे आपला संताप व्यक्त करत आहेत.
शेकडो युवक सैन्यात जायची प्रतिज्ञा करतात..
एका वाघाचा मृत्यू झाला आहे का? शेकडो बछडे जन्माला आलेत ?

मी संभ्रमात आहे...

सैनिकाच्या चितेभोवती जवळचे मित्र फोटो काढून घेण्यासाठी उभे राहतात.
ही नेमकी शोकसभा आहे का?
कुठला उत्सव ?

मी संभ्रमात आहे...
सगळेजण परत गेलेत. संधिप्रकाश पडतो आहे. मी एकटाच त्या ज्वालांच्या जवळ उभा आहे. थंडगार वारे वाहू लागले आहेत,
पण मला ऊब जाणवते आहे...

हा प्रकाश उगवत्या सूर्याचा आहे?
का शीतलता आहे मावळत्याची ?

मी संभ्रमात आहे...

मी परतीच्या विमानात बसतो.
ऐकायला थोडं विचित्र वाटेल...
पण मी शांत आहे ..मनातून शांत ...
मी माझ्या मित्रांच्या प्रेमात पडतोय ..
मी माझ्या माणसांच्या प्रेमात पडतोय ..

मी माझ्या देशाच्या प्रेमात पडतोय ..
मी माझ्या तिरंग्याच्या प्रेमात पडतोय..
पुन्हा एकवार ...
तो नेमका निरोप होता का? स्वागत...
तो नेमका शेवट होता का? एक आरंभ...

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा