Pages

पेज

शुक्रवार, २० नोव्हेंबर, २०१५

सीमेवरचा सैनिक

सीमेवरचा सैनिक आज शांतपणे झोपला होता

कित्येक दिवसांनी तो आज चिरकाल निद्रिस्त झाला होता

आज त्याचे खूप लाड होत होते

लहान बालकाप्रमाणे लोक त्याला स्नान घालीत होते

कित्येक दिवसानंतर त्याने खादी गणवेश उतरवला होता

कित्येक दिवसानंतर त्याने पांढरे शुभ्र कपडे परिधान केले

हार फुलांनी त्याला सजविले गेले तरीही

त्याच्या शरीराला मातृभूमिच्याच मातीचा सुगंध येत होता

सीमेवरचा सैनिक आज शांतपणे झोपला होता

सीमेवर रात्रंदिवस पहारा द्यायचा, तसा

उच्च अधिकार्याचा फर्मानच होता

म्हणून आजही त्याचे डोळे अर्धे उघडे होते

कारण त्याने मातृभूमीच्या रक्षणाचे धडे गिरविले होते

ऐंशी वर्ष्याची त्याची आई त्याला पाहून टोहो फोडीत होती

सुरुकुतलेल्या हाताने ती त्याला गोंजारीत होती

पंच्यायेंशी वर्ष्याचा दृष्टी आणि ऐकू कमी येणारा

त्याचा बाप घरासमोर कसला जलसा जमला आहे

असे अनेकांना विचारीत होता आणि लवकरच

आपला मुलगा सुट्टी घेवून येणार असल्याचा

प्रत्येकाला सांगत होता

सीमेवरचा सैनिक आज शांतपणे झोपला होता

भांबावलेला त्याचा चिमुरडा एकटक आपल्या पित्याकडे पाहत होता

आणि हा कोणता विधी आहे असे प्रश्न करीत होता

सैनिकाची पत्नी खिन्नपणे त्याच्या शेजारी बसली होती

जमलेल्या स्त्रिया तिच्या हातातून सौभाग्य चुडा उतरविता होती

तिला दिलेली सर्व वचने मोडून तो तिला कायमचा

सोडून निघून गेला होता

जमलेले त्याचे मित्र त्याला आवाज देवून त्याला उठवीत होते

आणि त्याला अशी मस्करी करायची सवय आहे 

असे एकमेकांना सांगत होते

कुठलाच आवाज कुठलाच आक्रोश

त्याला आज ऐकू येत नव्हता

सीमेवरचा सैनिक आज शांतपणे झोपला होता

मोठ्या दिमाखात त्याची अंतयात्रा निघाली

तोफांनी त्याला सलामी दिली

सर्व नात्यांची मिठी आज सैल झाली

देशभक्तीचा रंग परत आज उदयास आला होता 

भारतमातेचा आणखी एक पुत्र

मातृभूमीच्या रक्षणार्थ

आज शहीद झाला होता

आज शहीद झाला होता 

© सौ सविता मल्लिकार्जुन इंगळे 

Wife of  Mallikarjun Ingale Ex  CPO (Indian Navy)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा