Pages

पेज

मंगळवार, १८ ऑगस्ट, २०१५

एक पद एक निवृत्तीवेतन : माजी लष्कर प्रमुख मैदानात

एक पद  एक निवृत्तीवेतन  (OROP)  साठी पंतप्रधानांना पत्र, दोघांचे आमरण उपोषण सुरू नवी दिल्ली - ‘वन रॅंक वन पेन्शन‘ (ओआरओपी) लागू करण्याच्या मागणीसाठी केंद्र सरकारवरील दबाव वाढत असून, आज दहा माजी लष्कर प्रमुखांनी याबाबत सरकारला पत्र लिहिले आहे. तर, राजधानीत "जंतर-मंतर‘वर सुरू असलेले आंदोलन अधिक तीव्र केले जाण्याचे संकेत मिळत असून, दोघा माजी सैनिकांनी आमरण उपोषण सुरू केले आहे.
‘ओआरओपी‘ योजनेची अंमलबजावणी करण्यात देशातील राजकीय नेतृत्व कमी पडत असल्याचे सांगत दहा माजी लष्कर प्रमुखांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहिले असून, "ओआरओपी‘ योजना त्वरित लागू करण्याची मागणी केली आहे. "ओआरओपी‘च्या अंमलबजावणीस उशीर होत असल्यामुळे त्याचा परिणाम सैन्यदलांच्या नैतिक धैर्यावर होत असल्याचेही पत्रात नमूद करण्यात आले आहे. स्वातंत्र्यदिनी नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून केलेल्या भाषणात "ओआरओपी‘ लागू करण्याची पुन्हा एकदा ग्वाही दिली होती. मात्र, त्यामुळे समाधान न झालेल्या माजी सैनिकांनी सरकारवरील दबाव वाढविण्यासाठी विविध मार्गांनी प्रयत्न सुरू केले आहेत. पंतप्रधानांनी पूर्वीही आश्‍वासन दिले होते. त्यामुळे लाल किल्ल्यावरील भाषणामुळे माजी सैनिकांचे समाधान झाले नसून, "ओआरओपी‘ तत्काळ लागू करण्याच्या मागणीवर माजी सैनिक ठाम आहेत.
जंतर-मंतरवर आज दोन माजी सैनिकांनी आमरण उपोषण सुरू केले आहे. त्यामुळे माजी सैनिक आता मागे हटण्याच्या मनःस्थितीत नाहीत, असे संकेत मिळत आहेत.

पंतप्रधानांना लिहिलेल्या पत्रावर माजी लष्कर प्रमुख व्ही. एन. शर्मा, शंकर रॉय चौधरी, एस. पद्मनाभन. एन. सी. वीज, जे. जे. सिंग, दीपक कपूर आणि विक्रम सिंग यांच्या सह्या आहेत. पंतप्रधान मोदी यांच्या लाल किल्ल्यावरील भाषणात "ओआरओपी‘च्या अंमलबजावणीबाबत ठोस घोषणा नसल्याबद्दल पत्रात खेद व्यक्त करण्यात आला आहे.
[पीटीआय]

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा