Pages

पेज

गुरुवार, २९ सप्टेंबर, २०१६

चाबहार कराराला गती देण्यासाठी भारत अफगाणिस्तान आणि इराणमध्ये त्रिपक्षीय बैठक

नवी दिल्ली, केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग आणि नौवहन मंत्री नितीन गडकरी, अफगाणिस्तानचे वाहतूक नागरी उड्डयन मंत्री डॉ. मोहम्मदुल्लाह बताश आणि इराणचे रस्ते आणि नागरी विकास मंत्री डॉ. अब्बास अहमद अखौंडी यांच्यात आज नवी दिल्ली येथे बैठक झाली.

तेहरान येथे 23 मे 2016 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इराण व अफगाणिस्तानच्या राष्ट्राध्यक्षांमध्ये झालेल्या चाबहार बंदर त्रिपक्षीय कराराला गती देण्यासाठी ही बैठक झाली.

क्षेत्रीय दळणवळणासाठी चाबहार महत्त्वाचे आहे. चाबहार बंदर विकसित झाल्यामुळे निर्माण होणाऱ्या नव्या संधींबाबत जागरुकता निर्माण करण्यासाठी गेल्या दोन महिन्यात सर्व संबंधितांसाठी संमेलन आयोजित करण्याचे या बैठकीत ठरवण्यात आले. चाबहारमध्ये एक महिन्याच्या आत तिन्ही देशांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची तज्ज्ञस्तरीय बैठक बोलावण्याचेही यावेळी ठरवण्यात आले. कराराची लवकरात लवकर अंमलबजावणी होण्यासाठी करावयाच्या पुढल्या बाबींविषयीही या त्रिपक्षीय बैठकीत चर्चा झाली.

PIB
 
 

लष्करी कारवाई महासंचालकांचे निवेदन

नवी दिल्ली, जम्मू काश्मीरमध्ये प्रत्यक्ष नियंत्रण रेषेपलिकडून दहशतवाद्यांची घुसखोरी ही अत्यंत गंभीर बाब आहे. येत्या 11 आणि 18 सप्टेंबरला झालेल्या पूँछ आणि उरी दहशतवादी हल्ल्यात याचे प्रतिबिंब उमटले आहे. यावर्षी प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर किंवा जवळ असे 20 घुसखोरीचे प्रयत्न लष्कराने हाणून पाडले.

या दहशतवादी हल्ल्यात आणि घुसखोरीच्या प्रयत्नांमध्ये त्याचे मूळ पाकिस्तान असल्याचे सूचित करणाऱ्या जीपीएससहित अनेक बाबी आम्हाला सापडल्या आहेत. याखेरीज पाकिस्तान किंवा पाकव्याप्त काश्मीरमधल्या पकडण्यात आलेल्या अनेक दहशतवाद्यांनी त्यांना प्रशिक्षण आणि शस्त्रास्त्रे पाकिस्तानातून किंवा पाकिस्तानच्या नियंत्रणाखालील प्रदेशातून मिळाल्याची कबुली दिली आहे. लष्कराच्या माध्यमातून उच्चस्तरीय राजनैनिक पातळीवर ही बाब मांडण्यात आली आहे.

आपल्या भूमीचा किंवा नियंत्रणाखालील क्षेत्राचा वापर भारतविरोधी दहशतवादी कारवायांसाठी न होऊ देण्याच्या जानेवारी 2004 च्या कराराचे पाकिस्तानने पालन करावे, असे आवाहन वारंवार करूनही प्रत्यक्ष नियंत्रण रेषेपलिकडून घुसखोरी आणि दहशतवादी कारवाया सुरूच राहिल्या आहेत. यामुळे आपले नुकसान जर मर्यादित राहिले असेल तर ते आपल्या सैनिकांच्या अविरत प्रयत्नांमुळे. घुसखोरीरोधक बहुस्तरीय पध्दतीमुळे घुसखोरीचे अनेक प्रयत्न निष्फळ ठरले आहेत.

घुसखोरी करून जम्मू-काश्मीर आणि इतर महानगरांमध्ये दहशतवादी हल्ले घडवण्यासाठी प्रत्यक्ष नियंत्रणरेषेजवळ काही दहशतवादी तुकड्या तळ उभारुन सज्ज असल्याची खात्रीची गुप्तवार्ता मिळाल्याच्या पार्श्वभूमीवर भारतीय लष्कराने या तळांवर नेमके नियंत्रित हल्ले केले. विघातक कृत्यांमध्ये दहशतवादी यशस्वी होऊ नयेत हे उद्दिष्ट ठेवून ही कारवाई करण्यात आली.

या दहशतवादविरोधी कारवाई अनेक दहशतवादी मारले गेले आहेत. दहशतवाद्यांचा डाव निष्फळ केल्यानंतर कारवाई आता थांबवण्यात आली आहे. ती पुढे सुरू ठेवण्याचा आमचा कोणताही विचार नाही. मात्र कुठल्याही संभाव्य परिस्थितीवर मात करण्यासाठी भारतीय लष्कर सज्ज आहे.

पाकिस्तानी लष्कराच्या लष्करी कारवाई महासंचालकांच्या संपर्कात मी असून आपल्या कारवाईची माहिती त्यांना दिली आहे. क्षेत्रात शांती आणि सलोखा ठेवण्याचे भारताचे उद्दिष्ट आहे. मात्र दहशतवाद्यांनी प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ कार्यरत राहून आपल्या इच्छेप्रमाणे घुसखोरी करून आमच्या देशातील नागरिकांवर हल्ला करणे आम्ही सहन करणार नाही. क्षेत्रातून दहशतवाचा समूळ नायनाट करण्यासाठी पाकिस्तानी लष्कर आम्हाला सहकार्य करेल, अशी अपेक्षा आम्ही करतो.
 
PIB Release/DL/1518

मंगळवार, २७ सप्टेंबर, २०१६

काश्‍मीरचे दिवास्वप्न पाहू नका - सुषमा स्वराज

न्यूयॉर्क - ‘जम्मू-काश्‍मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे; तो बळकविण्याचे दिवास्वप्न पाकिस्तानने बघू नये,’’ अशा शब्दांत परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी आज पाकिस्तानला ठणकाविले. त्याचप्रमाणे दहशतवादाला आश्रय देणाऱ्या पाकिस्तानला जगाने एकटे पाडण्याचे आवाहनही त्यांनी केले. जम्मू-काश्‍मीरमध्ये कुरापती करण्यापेक्षा स्वत:च्या देशातील बलुचिस्तानमध्ये काय चालू आहे याकडे लक्ष द्यावे, असेही त्यांनी या वेळी स्पष्ट केले.

संयुक्त राष्ट्रसंघाच्या ७१व्या आम सभेत परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांचे आज भाषण झाले. स्त्री-पुरुष समानता, मेक इन इंडिया, स्वच्छ भारत अभियान, जनधन योजना याबाबत माहिती देत त्यांनी भाषणाला सुरवात केली. पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी गेल्या बुधवारी संयुक्त राष्ट्रसंघात केलेल्या भाषणाचा समाचार त्यांनी घेतला. त्या म्हणाल्या, ‘‘जगातील अनेक देश  दहशतवादाला बळी पडले आहेत. आज २१ व्या शतकाच्या सुरवातीपासून जग दहशतवादाचा मुकाबला करीत आहे. ब्रिटन, फ्रान्स, अमेरिका, भारत त्याचप्रमाणे सीरिया या देशांनी दहशतवादाची झळ सोसली आहे. दहशतवादाविरोधात लढण्याची एखाद्या देशाची तयारी नसेल तर आंतरराष्ट्रीय समूहातून त्याला दूर केले पाहिजे.’’

चर्चा करण्यासाठी भारत अटी घालत आहे, असा उल्लेख शरीफ यांनी त्यांच्या भाषणात केला होता. त्याचा समाचार स्वराज यांनी घेतला. भारत नेहमीच पाकिस्तानशी मैत्रीने वागला आहे. आमचे सरकार सत्तेवर आल्यानंतर शपथविधीसाठी पाकिस्तानच्या पंतप्रधानांना निमंत्रण देताना कोणती अट घातली होती, काबूलहून भारतात परतत असताना शरीफ यांची सदिच्छा भेट घेतली त्या वेळी कोणती अट घातली होती, अशा प्रश्‍नांची सरबत्ती त्यांनी केली. ईद, क्रिकेट सामने अशा अनेक प्रसंगी भारताने मैत्रीचाच हात पुढे केला होता.

स्वराज म्हणाल्या, ‘‘न्यूयॉर्कमध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या ९/११ च्या भीषण हल्ल्याला याच महिन्यात १५ वर्षे पूर्ण झाली. काही महिन्यांपूर्वी पॅरिससह इतर शहरांमध्येही हल्ले झाले. आमच्यावरही पठाणकोट आणि उरीमध्ये दहशतवाद्यांनी हल्ला केला. दहशतवाद हा मानवाधिकारांचे सर्वांत मोठे उल्लंघन आहे, ही गोष्ट सर्वांनी मान्य करायलाच हवी. दहशतवाद  कोणत्याही एका देशापुरता मर्यादित नाही. तो संपूर्ण मानवतेचा शत्रू आहे. या दहशतवाद्यांना आश्रय कोण देतो, त्यांना आर्थिक रसद कोण पुरवतो आणि प्रशिक्षण कोण देतो, याचाही विचार झाला पाहिजे. काही देश दहशतवाद्यांना आश्रय आणि समर्थन देत आहेत. काही दिवसांपूर्वी याच मंचावरून अफगाणिस्ताननेही अशीच भूमिका मांडत चिंता व्यक्त केली होती. दहशतवाद्यांमध्ये ‘चांगला-वाईट’, ‘आमचा-तुमचा’ असे वर्गीकरण करता येणार नाही. दहशतवादाशी लढायचे असेल तर सर्वांनी एकत्र यायला हवे. यासाठी आपसांतील मतभेद दूर करावे लागतील. हे अशक्‍य काम नाही. इच्छाशक्ती असेल तर करता येईल. ही लढाई कठीण असली, तरी पुढच्या पिढीसाठी आपल्याला ती करावी लागेल.’’

स्वराज म्हणाल्या...

- जिनके अपने घर शीशे के हो, उन्हें दूसरों के घर पत्थर नहीं फेकने चाहिए

- काश्‍मीर बळकावण्याचे स्वप्न पाहणे पाकिस्तानने सोडून द्यावे

- बलुचिस्तानात काय चालले आहे याकडे  पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी लक्ष द्यावे

- बहादुर अली हा तर दहशतवादाचा जिवंत पुरावा

- जगभरातील दहशतवाद हा मानवाधिकाराचे सर्वांत मोठे उल्लंघन

- सर्वांनी मतभेद विसरून दहशतवादाच्या विरोधात एकत्र येऊन लढा द्यावा

- छोट्या छोट्या संघटनांनी दहशतवादाचे भीषण स्वरूप धारण केले आहे

- - वृत्तसंस्था

कश्‍मीर तो होगा, लेकिन...- श्रीमंत माने

 पाकिस्तानमधून आलेल्या अतिरेक्‍यांनी जम्मू-काश्‍मीरमधल्या उरीच्या लष्करी तळावर केलेला भ्याड हल्ला आणि त्यात धारातीर्थी पडलेल्या अठरा भारतीय जवानांच्या हौतात्म्यामुळे प्रत्येक भारतीयाला प्रचंड वेदना झाल्या आहेत. गेल्या रविवारच्या या घटनेनंतर देशाच्या कानाकोपऱ्यात पाकिस्तानविरुद्ध मोठा क्षोभ आहे. भारतीय मने व्याकूळली आहेत. "दिल्लीतल्या सत्ताधाऱ्यांनी हल्ल्याचा बदला घ्यावा‘, ही देशवासीयांची भावना आहे. बदलादेखील कसा तर जगाच्या नकाशावरून पाकिस्तानचे नामोनिशाण मिटेल असा. ही भावना नेमकेपणाने व्यक्‍त करणारी एका अनामिकाची हिंदी कविता "सोशल मीडिया‘वर "व्हायरल‘ आहे. त्या कवितेचा "व्हिडिओ‘ उरीतल्या हल्ल्यानंतर प्रथम "यूट्यूब‘वर आला. "कश्‍मीर तो होगा, लेकिन पाकिस्तान नही होगा‘, या मथळ्याची ही वीररसातील कविता हिमाचल प्रदेश पोलिसांचा एक जोशिला हेड कॉन्स्टेबल पोलिस जवानांनी भरलेल्या एका बसमध्ये मोठ्या आवाजात म्हणतोय आणि बसमधले त्याचे सहकारी समूहस्वरात "पाकिस्तान नही होगा‘, अशी त्याला साथ देताहेत, असा तो "व्हिडिओ‘ आहे. त्या हेड कॉन्स्टेबलचे नाव आहे मनोज ठाकूर. आठवडाभरात लाखो भारतीयांनी तो पाहिलाय. "फेसबुक‘, "व्हॉट्‌सऍप‘वर तो वेगाने पुढे पाठवला जातोय.
पाकिस्तान ये कान खोलकर सुन ले,
अबकी अगर जंग छिडी तो नामोनिशान नहीं होगा
कश्‍मीर तो होगा, लेकिन पाकिस्तान नहीं होगा

असा इशारा नाठाळ शेजारी देशाला या कवितेतून देण्यात आला आहे. भारताचे स्वातंत्र्य, त्या वेळी झालेली फाळणी, पाकिस्तानचा जन्म आणि टोळीवाल्यांचा हल्ला ते 1965, 1971चे युद्ध, कारगिलमधील घुसखोरी अशा आतापर्यंतच्या पाकविरुद्धच्या लढाया, वेळोवेळी झालेले शांतता करार आदींचे संदर्भ देत ही कविता पुढे सरकते.

हम डरते नहीं अणुबम्बो और विस्फोटक जलपोतों से
हम डरते है शिमला और ताश्‍कंद जैसे समझोतों से

असं परखड मत मांडतानाच या कवितेत दुश्‍मनांना समज देण्यात आलीय, की

सियार भेडियों से डर सकती, सिंहों की औलाद नहीं
भारत वंश के इस पानी की है तुमको पहचान नहीं

या कडव्याने भारतवासीयांच्या शौर्याची आठवण करून देण्यात आलीय आणि "विश्‍व के मानचित्र पर पाकिस्तान नहीं होगा‘, असा इशारा दिला गेलाय.
"सोशल मीडिया‘ व अन्य माध्यमांमधून समोर आलेल्या माहितीनुसार, हा "व्हिडिओ‘ उरी हल्ल्यापूर्वीच, गेल्या कारगिल विजय दिनाला, 26 जुलैला तयार केला होता. महत्त्वाचे म्हणजे ही कविता कुणाची आहे, याचा शोध गेली अनेक वर्षे संमेलने व कथांमध्ये ही कविता ऐकविणाऱ्या साध्वी बालिका सरस्वती किंवा बालिका साध्वी ठाकूर यांनाही माहिती नाही. साध्वी बालिका सात वर्षांच्या असल्यापासून कथा करतात व तेराव्या वर्षी त्यांनी ही कविता पहिल्यांदा गायली. केवळ भारतातच नव्हे; तर देशाबाहेरच्या अनेक धार्मिक कार्यक्रमांमध्येही तिचा उच्चार झाला. इंग्लंडमध्ये वगैरे दहशतवादाविरोधातला भारतीय आवाज असे तिचे वर्णन केले गेले. "आयएसआय‘ व अन्य काही संघटनांकडून त्यासाठी साध्वी बालिका सरस्वती यांना धमक्‍याही मिळाल्या. असे मानले जाते, की साध्वी बालिकाने गायलेली ही कविता मनोज ठाकूर यांनी ऐकली असावी. ओतप्रोत देशप्रेम आणि भारतीयांच्या मनातला पाकविरोधी संताप नेमकेपणाने व्यक्‍त करणारी ती असल्याने त्यांनी सहकारी जवानांच्या साक्षीने गाऊन तिचा "व्हिडिओ‘ तयार केला असावा. उरी हल्ल्यानंतर ती अशी "व्हायरल‘ झाली, तेव्हा मनोज ठाकूर यांनी देशवासीयांना उद्देशून एक संदेशही "सोशल मीडिया‘वर टाकला. तमाम भारतीयांच्या प्रखर देशभक्‍तीला त्या संदेशात त्यांनी सलाम केलाय.

सोमवार, २६ सप्टेंबर, २०१६

लष्कर बोलत नाही, थेट पराक्रम करते!

नवी दिल्ली - उरीतील पाकिस्तानी दहशतवाद्यांच्या भ्याड हल्ल्यानंतर मौनात गेलेल्या केंद्र सरकारचे प्रमुख, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सलग दुसऱ्या दिवशी म्हणजे केरळातील सभेपाठोपाठ "आकाशवाणी” वरील “मन की बात” मधून उरी हल्ल्याचा उच्चार करत हल्ल्याला जबाबदार असणाऱ्यांना माफ करणार नाही, असे सांगितले. “लष्कर बोलत नाही, थेट पराक्रम करते”, असा अत्यंत सूचक इशारा मोदी यांनी शत्रूराष्ट्राला दिला.


“मन की बात” ला आज दोन वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्त “आकाशवाणी” ला पंतप्रधानांनी धन्यवाद दिले. मोदी यांनी काल कोझीकोडच्या जाहीर सभेत उरीतील 18 हुतात्मा जवानांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही, असा विश्‍वास देशवासीयांना दिला होता. सत्तेवर येण्यापूर्वीचे मोदी यांची भाषा उरीतील हल्ल्यानंतर एकदम बदलून मवाळ झाल्याने शोकसंतप्त देशवासीयांमध्ये सखेद आश्‍चर्य व्यक्त होत आहे. जनतेचा आक्रोश “पीएमओ” पर्यंत पोचल्यानेच मोदींना उरी हल्ल्याचा सलग दोनदा जाहीर उच्चार करणे भाग पडल्याचे मानले जाते.


मोदींनी आजच्या कार्यक्रमाची सुरवातच उरी हल्ल्यातील 18 हुतात्म्यांना आदरांजली वाहून केली. या हल्ल्याबाबत पंतप्रधानांनी एकदा किमान तोंड तरी उघडावे, अशा प्रकारच्या सूचनांचा पाऊस "नरेंद्र मोदी व माय जीओव्ही ऍप‘वर पडला होता. त्या अनुषंगाने मोदी म्हणाले,  “आपली सेना शूर आहे व भारतात घुसखोरी करण्याचा प्रत्येक प्रयत्न ती हाणून पाडेल. राजकारण्यांना बोलण्याच्या अनेक संधी मिळतात; पण लष्कर बोलत नाही, तर फक्त पराक्रम करते.”

 
काश्‍मीरमधील अशांततेबाबत बोलताना सत्यपरिस्थिती काश्‍मिरी लोकांसमोर आल्याने त्या लोकांनाही शांतता हवी आहे, असा दावा केला. उरीतील हल्ल्यानंतर हर्षवर्धन या 11वीच्या विद्यार्थ्याने पाठवलेल्या पत्राचा उल्लेख मोदींनी केला. महात्मा गांधी स्वच्छता मोहिमेच्या द्विवर्षपूर्तीनिमित्त मोदींनी या मोहिमेची सुरवात चांगली झाल्याचे प्रशस्तीपत्र स्वतःच्या सरकारला दिले. दिल्लीतील रेस कोर्स रोडचे बारसे लोककल्याण मार्ग असे नुकतेच करण्यात आले. या नामबदलाचे ठाम समर्थन करताना पंतप्रधानांनी पंडित दीनदयाळ उपाध्याय यांचे नाव या नामबदलाशी जोडले.
अपंग खेळाडूंचे कौतुक

रियो पॅराऑलिंपिक स्पर्धेत अपंग खेळाडूंनी केलेल्या भरीव कामगिरीची मोदींनी भरभरून स्तुती केली. अपंगत्वालाही पराभूत करणाऱ्या नगरच्या दीपा मलिक, एका तपानंतर दुसऱ्यांदा ऑलिंपिक सुवर्णपदक पटकावून वयावर मात करणारे देवेंद्र जांझरिया, 21 वर्षांचा एम. थंगवेलू या सुवर्णपदक विजेत्यांचे त्यांनी मुक्तपणे कौतुक केले.

-सकाळ न्यूज नेटवर्क

मराठा मोर्चांचा आवाज सरकारच्या कानी

नवी मुंबई - "राज्यात सध्या विविध मागण्यांसाठी मराठा समाजाचे मूक मोर्चे निघत असले, तरी त्यांचा आवाज एक कोटी जनतेपेक्षा जास्त आहे. त्यामुळे राज्य सरकारने या मोर्चांची गंभीर दखल घेऊन कार्यवाहीला सुरवात केली आहे,‘‘ अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे दिली. मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी सरकार सकारात्मक भूमिकेत असून न्यायालयात सरकारकडून बाजू मांडण्यासाठी 74 पुरावे गोळा केले असल्याचेही त्यांनी या वेळी सांगितले. येथे माथाडी कामगार नेते अण्णासाहेब पाटील यांच्या जयंतीनिमित्ताने झालेल्या कामगारांच्या मेळाव्यात देवेंद्र फडणवीस बोलत होते.


राज्यात मराठा समाजाच्या मूक मोर्चांमधून सर्व समाजांसमोर शिस्तबद्धता, शांतता आणि संवेदना दाखवून देण्याचे काम होत आहे. त्यामुळे मी आयोजकांचे कौतुक करतो, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. मराठा समाजाच्या मागण्या लोकशाही मार्गाने सोडवण्यासाठी चर्चेची गरज असून सरकार फक्त चर्चा न करता खरोखर निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. मात्र सरकारचा निर्णय कोर्टात टिकाव धरून राहावा, यासाठी मराठा समाजातील नेत्यांनी सरकारसोबत चर्चा करण्यासाठी एक पाऊल पुढे यावे, असे आवाहन त्यांनी केले. मराठा समाजातील एक वर्ग श्रीमंत झाला, याचा अर्थ असा होत नाही, की सर्व मराठा समाज श्रीमंत झाला, असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी आर्थिक दुर्बल असलेल्या मराठ्यांच्या मुद्द्याला हात घातला.

अभियांत्रिकी शिक्षणाच्या विषयावरही मुख्यमंत्र्यांनी प्रकाश टाकला. राज्यात अभियांत्रिकी विभागाच्या सरकारी प्रवेशाच्या जागा कमी असून सर्वात जास्त जागा खासगी अभियांत्रिकी महाविद्यालयांत असून सर्वात जास्त महाविद्यालये कोणाची आहेत, हे मी सांगण्याची गरज नाही, असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजातील शिक्षणमहर्षींना टोला लगावला. खासगी शिक्षण क्षेत्रातील अभियांत्रिकी विषयाच्या एक लाख 45 हजार जागांवर मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना आरक्षण मिळावे, यासाठी लवकरच कायद्यात बदल करू, असे आश्‍वासनही त्यांनी दिले. राज्य सरकारकडून दोन वर्षात फक्त 50 हजार जागांवर भरती निघाली असून त्यातून 16 टक्के आरक्षणानुसार मिळालेल्या साडेसात हजार जागा मराठा समाजाच्या तरुणांना सामावून घेण्यासाठी पुरेशा नाहीत. त्यामुळे खासगी क्षेत्रात विविध नोकऱ्यांच्या संधी लक्षात घेत मराठा समाजाच्या तरुणांना प्रशिक्षण देण्याची गरज निर्माण झाली आहे, असे त्यांनी सांगितले.

न्याय मिळेल

देशातील न्यायव्यवस्था सक्षम असून कोपर्डी प्रकरणात ती योग्य न्याय करील, असा विश्‍वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. कोपर्डी प्रकरणातील नराधमांना फाशीची शिक्षा व्हावी, अशी मागणी सरकारकडून केली जाणार आहे. तसेच या प्रकरणात सरकारची बाजू मांडण्यासाठी प्रसिद्ध सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची नियुक्ती केली असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.

सर्व माथाडी कामगारांना घरे

माथाडी कामगारांच्या मेळाव्यालाही मुख्यमंत्र्यांनी उपस्थिती लावली. या वेळी त्यांनी सर्व माथाडी कामगारांना घरे देण्याबरोबरच अनेक घोषणा केल्या.

प्रमुख घोषणा

- अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळासाठी 200 कोटींची तरतूद
- मुक्त पणन योजनेअंतर्गत माथाडी कामगारांना बाजार समितीव्यतिरिक्त माल उचलण्यास प्राधान्य
- माथाडी बोर्ड व सुरक्षा मंडळांची पुनर्रचना
- माथाडी बोर्डात माथाडींच्या मुलांना सामावून घेण्यासाठी कायद्यात सुधारणा
- पंतप्रधान आवास योजनेंतर्गत सर्व माथाडी कामगारांना घरे

 

- - सकाळ वृत्तसेवा

चर्चा खूप झाली... आता निर्णय हवा!

पुणे - "मराठा समाजाने कोणत्याही नेतृत्वाशिवाय संयमाने आणि शिस्तीने भावना मांडल्या आहेत. त्यासाठी कोणत्याही तथाकथित मराठा नेत्याला बोलावून त्याच्याशी चर्चा करण्याची गरज नाही. मागण्यांबाबत चर्चा खूप झाली, आता निर्णय हवा आहे...‘‘ अशी मागणी मराठा मोर्चातील युवतींनी केली.


मेधा कुरुमकर, नुपूर दरेकर, पौर्णिमा पाध्ये, करिष्मा पारधी आणि सानिया तापकीर या युवतींनी जिल्हाधिकारी सौरभ राव यांच्याकडे मागण्यांचे निवेदन दिले. या वेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी रमेश काळे उपस्थित होते. जिल्हाधिकाऱ्यांनी निवेदन वाचल्यानंतर काही बोलायचे आहे काय, अशी विचारणा या युवतींच्या शिष्टमंडळाकडे केली. त्यावर प्रत्येकीने मागण्यांबाबत निवेदन केले. कोपर्डी घटनेतील आरोपींना तातडीने फाशी द्या; तसेच ऍट्रॉसिटी कायद्याचा गैरवापर करणाऱ्यांनाही शिक्षा द्या, शेतकऱ्यांची आत्महत्या रोखण्यासाठी काहीतरी उपाययोजना करा, शेतकऱ्यांच्या मुलींना पैशाअभावी शिक्षण मिळत नाही. त्यामुळे त्यांना शिक्षण घेता यावे यासाठी उत्पन्नाची मर्यादा वाढवा, मराठा युवकांना व्यवसायासाठी साह्य करा आणि अरबी समुद्रातील शिवस्मारकाचे काम तातडीने पूर्ण करा, अशा मागण्या या युवतींनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केल्या. मागण्या ऐकल्यानंतर जिल्हाधिकारी सौरभ राव यांनीही सकारात्मक प्रतिसाद देत तुमच्या मागण्या आधीच सरकारपर्यंत पोचल्याचे सांगितले. कोपर्डी घटनेची चौकशी स्वतः पुण्याच्या पोलिस आयुक्तांकडे असून, आरोपींना लवकर शिक्षा होण्यासाठी प्रयत्न करण्यात येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी राज्य सरकार काम करत असल्याचेही त्यांनी सांगितले. ते म्हणाले, ""अनेक मागण्या या धोरणात्मक आहेत. त्यातील काही गोष्टींबाबत कार्यवाहीही सुरू आहे. तुमच्या मागण्या सरकारपर्यंत पोचविल्या जातील.‘‘ मागण्यांचे निवेदन दिल्यानंतर शिष्टमंडळ शांतपणे बाहेर रस्त्यावर मोर्चात सहभागी झाले.


दरम्यान, ऍट्रॉसिटी कायद्याबाबत आंदोलकांमध्ये प्रचंड चीड होती. या कायद्याच्या कवचकुंडामुळेच कोपर्डीतील आरोपींनी आधीही एक खून पचवला आहे. या कायद्याच्या गैरवापराच्या कचाट्यातून अनेक सरकारी अधिकारी आणि पोलिस महासंचालकही सुटले नाहीत. त्यामुळे लोकांचे जगणे कठीण झाल्याने या कायद्यात दुरुस्ती करून आरोपीला अटकपूर्व जामीन मिळावा, पोलिस अधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्याने पडताळणी केल्यानंतरच गुन्हा दाखल करावा आणि खोटे गुन्हे दाखल करणाऱ्यांविरोधातही शिक्षेची तरतूद करावी, अशा मागण्या आंदोलकांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात केल्या आहेत.

मराठा समाजाच्या मागण्या-
कोपर्डीचा खटला जलदगती न्यायालयात चालवून आरोपींना फाशी द्या.
सर्व मराठ्यांना मराठा कुणबी जातीचे प्रमाणपत्र मिळावे.
शिवाजी महाराजांचे भव्य स्मारक उभारावे.
शेतकऱ्यांना स्वामिनाथन आयोगाच्या शिफारसी लागू कराव्यात.
शेतकऱ्यांची आत्महत्या रोखण्यासाठी कर्जमुक्ती आणि पिकाला हमीभाव मिळावा.
राज्य कृषी आयोग स्थापन करून शेतकऱ्यांसाठी मोफत विमा योजना राबवावी.
आत्महत्याग्रस्त कुटुंबाला दहा लाख रुपये आर्थिक मदत द्यावी.
शिक्षण व नोकरीमध्ये आरक्षण द्यावे.
अण्णासाहेब पाटील महामंडळ मराठ्यांपुरते स्थापन करावे.

शनिवार, २४ सप्टेंबर, २०१६

भारताच्या महिला प्रतिनिधीने पाकला सुनावले

संयुक्त राष्ट्रसंघ- पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांचे भाषण म्हणजे लांबलचक निंदात्मक भाषण होते, अशी थेट टीका करीत भारताच्या संयुक्त राष्ट्रसंघातील स्थायी मोहिमेतील प्रथम सचिव इनाम गंभीर यांनी संयुक्त राष्ट्रसंघामध्ये पाकिस्तानला प्रत्युत्तर दिले.

संयुक्त राष्ट्रसंघाच्या सर्वसाधारण सभेच्या 71व्या सत्रात चर्चेदरम्यान प्रतिक्रिया देण्याचा अधिकार (राइट टू रिप्लाय) वापरत गंभीर यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. त्यांच्या भाषणाची दखल सर्व माध्यमांनी घेतली.

दहशतवादाला खतपाणी घालण्यावरून पाकिस्तानवर हल्लाबोल केला. त्यांच्या भाषणात राजनैतिक औपचारिकता जास्त नव्हती, मात्र ते परिणामकारक ठरले.

‘प्राचीन काळातील शिक्षणाचे महान केंद्र असलेल्या तक्षशीलेची भूमी आता दहशतवाद्यांची शाळा, नंदनवन बनली आहे. दहशतवादी बनू इच्छिणाऱ्यांना आणि प्रशिक्षण घेण्याची इच्छा असणाऱ्या जगभरातील तरुणांना पाकिस्तान आकर्षित करते! त्यांच्या विषारी अभ्यासक्रमाची फळे संपूर्ण जगाला भोगावी लागत आहेत.‘

बुधवार, २१ सप्टेंबर, २०१६

टपाल विभागाच्या टोल फ्री क्रमांकाची सुरुवात

नवी दिल्ली, टपाल विभागाने ग्राहकांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी 1924 या टोल फ्री क्रमांकाची सुरुवात केली आहे. या सेवेअंतर्गत ग्राहकांच्या टपालासंदर्भातील तक्रारींचे निवारण एका दिवसात करण्यात येणार आहे. केंद्रीय दळणवळण मंत्री मनोज सिन्हा यांनी नुकतेच नवी दिल्लीत टपाल भवनात या सेवेचे उद्‌घाटन केले. ‘भारतीय टपाल सहायता केंद्र’ असे या केंद्राचे नाव आहे. या क्रमांकावर तक्रार केल्यानंतर तक्रारदाराला 11 अंकी तिकीट क्रमांक दिला जाणार आहे. त्यानंतर त्या क्रमांकाचा वापर करुन तक्रारदार आपल्या तक्रारीच्या निवारणाची स्थिती जाणून घेऊ शकणार आहे. रविवार आणि सुट्टींचे दिवस वगळून ही सेवा सकाळी 8 ते रात्री 8 या वेळेत सुरु राहणार आहे. ग्राहकांना कुठल्याही दूरध्वनी अथवा मोबाईल क्रमांकावरुन या हेल्पलाईनशी संपर्क साधता येईल.

मंगळवार, २० सप्टेंबर, २०१६

देशभरात 437 प्रधानमंत्री जनऔषधी केंद्रे कार्यरत

नवी दिल्ली, देशातील गरीब आणि वंचितांना परवडणाऱ्या दरात दर्जेदार औषधे उपलब्ध करुन देणे हा केंद्र सरकारचा प्रमुख उद्देश आहे.
प्रधानमंत्री जनऔषधी योजनेअंतर्गत सर्वांना जेनेरिक औषधे किफायतशीर दरात उपलब्ध करुन दिली जातात.
20 सप्टेंबर 2016 पर्यंत देशभरातील 26 राज्ये/केंद्रशासित प्रदेशांमध्ये 437 प्रधानमंत्री जनऔषधी केंद्रे कार्यरत आहेत. मार्च 2017 पर्यंत 3 हजार प्रधानमंत्री जनऔषधी केंद्रे उघडण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे.
सरकारी रुग्णालयांमध्ये प्रधानमंत्री जनऔषधी केंद्रे उघडण्यासाठी महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, पंजाब, हरियाणा, केरळ, आसाम आदी राज्यांच्या सरकारबरोबर चर्चा सुरु आहे. 

सोमवार, १९ सप्टेंबर, २०१६

चाळीसगावचे भोकरे बनले देशाचे व्हाईस ऍडमिरल

चाळीसगाव - येथील रहिवासी सुनील भोकरे यांची भारतीय नौदलाच्या व्हाईस ऍडमिरलपदी नियुक्ती झाली. हे पद नौदलातील अतीउच्च पद असल्याने या नियुक्तीमुळे चाळीसगावच्या लौकीकात विशेष भर पडली आहे. सध्या श्री. भोकरे हे केरळ राज्यातील इझिनाला येथील इंडियन नेव्हल अकॅडमीत व्हाईस ऍडमिरल म्हणून जबाबदारी सांभाळणार आहेत. सुनील भोकरे हे जळगावचे कृषी प्रकल्प व्यवस्थापक व कृषी उपसंचालक अनिल भोकरे यांचे मोठे बंधू आहेत.

मूळचे गुढे (ता. भडगाव) येथील रहिवासी तथा कृषी सहाय्यक वसंतराव शंकर भोकरे यांचे सुपुत्र असलेले सुनील भोकरे यांना लहानपणापासूनच नौदलात जाण्याची इच्छा होती. त्यांचे प्राथमिक शिक्षण गुढे येथे झाले. पाचवी ते बारावीपर्यंत सातारा येथील सैनिक स्कूलमध्ये त्यांनी शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर खडकवासाला (पुणे) येथे शिक्षण घेऊन नौदल ऑफिसर झाले. ऑक्‍टोबर 2013 मध्ये विशाखापट्टण येथे रियल ऍडमिरल म्हणून त्यांनी सूत्रे हाती घेतली. नौदलाच्या पूर्व ताफ्याच्या ध्वजाधिकारी पदाची सूत्रे रिअर ऍडमिरल ए. बी. सिंग यांच्याकडून स्वीकारली होती. आतापर्यंत सुनील भोकरे यांना नऊ विशेष सेवा पदके प्राप्त झाली आहेत. फेब्रुवारी महिन्यात राष्ट्रपती प्रणव मुखर्जी व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत झालेल्या आंतरराष्ट्रीय "नेव्ही डे‘ कार्यक्रमाला 51 देशांतील नौदलाचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. त्यात सुनील भोकरेंचा सहभाग होता. याचवेळी त्यांच्याकडे इंडियन नेव्हल अकॅडमीची सूत्रे देण्यासंदर्भात विचार करण्यात आला होता. त्यानुसार, काल (ता. 16) त्यांच्या व्हाईस ऍडमिरलपदी नियुक्तीची अधिकृत घोषणा करण्यात आली.

आमदारांची भेट

आज "व्हॉट्‌स ऍप‘वर सुनील भोकरे यांच्या नियुक्तीचा "मेसेज‘ फिरल्यानंतर त्यांचे लहान बंधू कृषी उपसंचालक अनिल भोकरे यांच्यावर शुभेच्छांचा दिवसभर वर्षाव सुरू होता. अनेकांनी त्यांना भ्रमणध्वनीवरुन तर काहींनी प्रत्यक्ष भेट शुभेच्छा दिल्या. सुनील भोकरे सध्या समुद्रात जहाजावर असल्याने त्यांचा संपर्क होऊ शकला नाही. चाळीसगावला त्यांचे वडील वसंतराव भोकरे यांची आज आमदार उन्मेष पाटील यांनी प्रत्यक्ष घरी जाऊन भेट घेतली. सुनील भोकरे यांच्या या नियुक्तीमुळे चाळीसगावच्या लौकीकात भर पडली आहे.

मुलाच्या या नियुक्तीमुळे भारावलो आहे. माझा नातू अथर्व (अनिलचा मुलगा) हा देखील त्याच्या पावलावर पाऊस ठेवत "एनडीए‘ची परीक्षा देत आहे. संरक्षण खात्यातील आर्मी, नेव्ही व एअरफोर्स अशा कुठल्याही शाखेत नोकरीच्या अनेक संधी आहेत. त्यामुळे पालकांनी आपल्या मुलांना या शाखांमध्ये प्रवेशासाठी प्रोत्साहीत करून देशसेवेसाठी प्रेरीत करावे.

- वसंतराव भोकरे, चाळीसगाव

- सकाळ वृत्तसेवा

रविवार, 18 सप्टेंबर 2016 - 01:00 PM IST

http://online3.esakal.com/NewsDetails.aspx?NewsId=5288185379531402657&SectionId=28&SectionName=ताज्या बातम्या&NewsDate=20160918&Provider=- सकाळ वृत्तसेवा&NewsTitle=चाळीसगावचे भोकरे बनले देशाचे व्हाईस ऍडमिरल

रविवार, १८ सप्टेंबर, २०१६

उरीतील हल्ला पाकिस्तान पुरस्कृतच- सुभाष भामरे

नाशिक - जम्मू काश्मीरमधील उरी येथील लष्करी मुख्यालयावर करण्यात आलेला दहशतवादी हल्ला हा पाकिस्तान पुरस्कृतच आहे. आता प्रतिउत्तर देण्याची वेळ आली आहे, असे मत केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांनी व्यक्त केले.
जम्मू काश्मीरमधील उरी येथे असलेल्या लष्कराच्या मुख्यालयावर आज (रविवार) सकाळी दहशतवाद्यांनी केलेल्या भीषण हल्लात 17 जवान हुतात्मा झाले असून, 8 जवान जखमी झाले आहेत. सुरक्षा रक्षकांनी चार दहशतवाद्यांना ठार मारले आहे. या हल्ल्यानंतर भामरे नाशिक दौरा रद्द करून दिल्लीला रवाना झाले आहेत.
भामरे म्हणाले की, आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकिस्तानला घेरण्याची वेळ आली आहे. आता खूप झाले, प्रतिउत्तर देण्याची वेळ आली आहे. उच्चस्तरीय समितीची बैठक होत असून, या बैठकीत माझी भूमिका हीच असेल. लंडनमध्ये गेल्यानंतर सीमेपलिकडून होणाऱ्या दहशतवादासंदर्भात मी जगातील संरक्षणमंत्र्यांपुढे भूमिका मांडलेली आहे. दहशतवादाविरोधात लढण्यासाठी सर्वांनी एकत्र यावे, असे अमेरिका फ्रान्ससह इतर देशांसोबत झालेल्या बैठकीत भूमिका मांडली होती. पाकिस्तानसोबत असलेल्या देशांनी दहशतावादासंदर्भात गंभीरपणे विचार करण्याची वेळ आली आहे.
- महेंद्र महाजन - सकाळ वृत्तसेवा

रविवार, 18 सप्टेंबर 2016 - 12:27 PM IST

बुधवार, १४ सप्टेंबर, २०१६

नौदलातील वरिष्ठ खलाशांसाठीच्या पहिल्या परिषदेचे मुंबईत उद्‌घाटन

नौदलातील वरिष्ठ खलाशांच्या एकात्मिकरणासाठी आणि सक्षमीकरणासाठीच्या नव्या उपक्रमांतर्गत मुंबईत पश्चिम नौदल कमांडतर्फे पहिल्या मास्टर चीफ पेट्टी ऑफिसर्स (एमसीपीओ) परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. पश्चिम नौदल कमांडचे ध्वजाधिकारी व्हाइस ॲडमिरल गिरीश लुथ्रा यांच्या हस्ते या दोन दिवसीय परिषदेचे आज सकाळी उद्‌घाटन झाले. एमसीपीओ या प्र वर्गात नौदलातील सर्वात वरिष्ठ खलाशांचा समावेश असतो आणि ते अत्यंत अनुभवी असतात. या खलांशाचे अनुभव आणि कुशलता समावेशक व्यवस्थापक पद्धतीने विश्लेषणाच्या माध्यमातून व्यावसायिक स्वरुपात मांडणारी ही अशा प्रकारची खलाशांची पहिली परिषद आहे. या परिषदेत नौदल परिचालन, मनुष्यबळ संबंधी मुद्दे, तांत्रिक आणि प्रशासकीय आव्हाने, देखभाल आणि माहिती तंत्रज्ञानाचा समावेश अशा विविध मुद्दयांबाबत चर्चा अपेक्षित आहे. महाराष्ट्रासह गुजरात, गोवा आणि कर्नाटक मधल्या नौदल एककांमधले एमसीपीओ या परिषदेत सहभागी होत आहेत. परिषदेचे कार्यक्रम पत्रक तयार करणे, सादरीकरण, चर्चा आणि योग्‍य कार्यवाहीची जबाबदारी वरिष्ठ खलाशांवर आहे.

यावेळी बोलताना व्हाइस ॲडमिरल गिरीश लुथ्रा यांनी  बौद्धिक सक्षमीकरणासह सर्व स्तरांवरील सक्षमीकरणावर भर दिला. विश्लेषण आणि चर्चांमध्ये सर्व सहभागींनी योगदान द्यावे अशी विनंती त्यांनी केली.

ही बैठक वार्षिक तत्त्वावर आयोजित केली जाणार आहे.  

 

PIB Release/MH/220

मंगळवार, ६ सप्टेंबर, २०१६

शिक्षक दिनी गुरुजनांना गुगलचे "डूडल' वंदन! - सकाळ वृत्तसेवा

पुणे - गणरायाच्या आगमनाबरोबरच शिक्षकदिन सोमवारीच (5 सप्टेंबर) होता. मात्र, बाप्पांच्या ढोल-ताशांच्या जल्लोषात शिक्षकदिन काहीसा दुर्लक्षितच राहिला. तथापि, जगभरातील माहितीचा खजिना सांभाळून असलेल्या "गुगल‘ला गुरुजनांचा विसर पडला नाही. खास शिक्षकदिनाचं औचित्य साधत गुगलने आगळं-वेगळं "डूडल‘ साकारत गुरुजनांना वंदन केलं.

      खोडरबर अन्‌ टोकदार शिसपेन्सिल म्हणजे शाळेच्या काळाची कायमची कोरली गेलेली ओळखंच... हीच ओळख घेत गुगलने हे "डूडल‘ बनवलं होतं. उंचीने सगळ्यात मोठी असणारी एक पेन्सिल, अर्थात मुलांना कुठलासा धडा शिकवताना फळ्यावर लिहिणारे आणि गृहपाठ घेणारे गुरुजी... आणि त्यांच्या मागे असणारे पाच विद्यार्थी (आकाराने चिमुकल्या पेन्सिली) हे या "डूडल‘चे मध्यवर्ती कॅरेक्‍टर्स!

     एकमेकांचे जिग्री दोस्त असणारे आणि हातात हात घालून रमतगमत शाळेला निघालेले दोघे, आपलं पुस्तक-वही घट्ट धरून ठेवलेला आणि "ढापण‘ मिरवत इकडे-तिकडे पाहणारा एक, पुस्तक वाचनात गढून गेलेला आणि आसपासचं भानंच नसणारा एक... आणि उशीर झाला म्हणून नुकताच धावतपळत वर्गात पोचलेला चिमुकला...अशी एरवी रोज पाहायला मिळणारी खास "शाळू-सोबती‘ ढंगातली ही पात्र होती.

     देशाचे द्वितीय राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जन्मदिनानिमित्त देशभरात 5 सप्टेंबर हा दिवस "शिक्षक दिन‘ म्हणून साजरा केला जातो. "डूडल कलाकार नेट स्वाईनहर्ट‘ यांनी शिक्षकदिनावरील या "डूडल‘ची निर्मिती केली आहे.

फक्त एका देशामुळे दहशतवाद

होंगझोऊ (5 सप्टेंबर 2016) - जी -20 परिषदेच्या अखेरच्या  दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दहशतवादाला प्रोत्साहन देणाऱ्या देशांचा समाचार घेतला. तसेच, "फक्त एक दक्षिण आशियाई देश  दहशतवाद पसरवित आहे”, अशी टीका त्यांनी पाकिस्तानचे नाव न घेता केली. 

परिषदेच्या अखेरच्या सत्रात बोलताना मोदी म्हणाले, हिंसा आणि दहशतवादाची ताकद वाढत असल्याने जगासमोर नवे आव्हान निर्माण झाले आहे. काही देश तर दहशतवादाचा वापर धोरण म्हणूनच करत आहेत. दक्षिण आशियामध्ये एकच देश असा आहे की तो दहशतवाद पसरवित असून, दहशतवाद्यांना साथ देत आहे. दहशतवादाला अजिबात थारा न देण्याचे भारताचे धोरण आहे. आमच्यासाठी प्रत्येक दहशतवादी सारखाच असल्याचे सांगून मोदी यांनी पाकिस्तानच्या चांगले दहशतवादी, वाईट दहशतवादी या कल्पनेची खिल्ली उडविली.

दहशतवादाविरोधात लढण्यासाठी तातडीने एकत्र येण्याचे आवाहन मोदी यांनी आंतरराष्ट्रीय समुदायाला केले. दहशतवादाला प्रोत्साहन देणाऱ्या देशांना एकटे पाडून त्यांच्यावर निर्बंध लादावेत, दहशतवाद्यांची आश्रयस्थाने नष्ट करावीत, अशी मागणीही त्यांनी केली. जगासमोर दहशतवादाविरोधातील भारताची भूमिका ठळकपणे मांडण्याची संधी मोदींनी वेळोवेळी साधली आहे.

उत्तर कोरियाची क्षेपणास्त्र चाचणी
जी-20 परिषद चोख पार पाडण्यासाठी आटोकाट प्रयत्न करणाऱ्या चीनला आज त्यांच्या मित्रदेशाने तोंडघशी पाडले. परिषद संपत असतानाच उत्तर कोरियाने आज तीन क्षेपणास्त्रांची चाचणी घेत आपले उपद्रवमूल्य दाखवून दिले. यामुळे परिषदेसाठी आलेल्या दक्षिण कोरियाच्या पार्क ग्वेन हे आणि जपानचे पंतप्रधान शिंझो ऍबे यांनी तातडीची बैठक घेत परिस्थितीवर संयुक्तपणे लक्ष ठेवण्याचे मान्य केले. उत्तर कोरियाच्या चाचण्यांमुळे जगात अशांतता पसरत असून, चीनने त्यांच्यावर नियंत्रण ठेवावे, अशी मागणीही काही देशांनी केली.