Pages

पेज

रविवार, १० एप्रिल, २०१६

भारतीय स्टेट बॅंकेत सहायकांची 'मेगा'भरती

देशभरात 15 हजार; तर महाराष्ट्रात साडेसातशे जागा

औरंगाबाद - मेगाभरती करण्याची परंपरा भारतीय स्टेट बॅंकेने यंदाही कायम राखली आहे. देशभरात बॅंकेतर्फे लिपिक संवर्गातील 15 हजारांच्या वर जागा भरल्या जाणार असून, यात महाराष्ट्रासाठीच्या साधारणतः साडेसातशे जागांचा समावेश आहे. कनिष्ठ सहायक आणि कनिष्ठ कृषिसहायक या दोन पदांची ही भरती होईल.

नियमित आणि विशेष भरती मोहिमेअंतर्गत एसबीआयने या जागा भरण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. 25 एप्रिलपर्यंत ऑनलाइन पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार असून, त्यासाठी स्वतःचा ई-मेल आयडी असणे अत्यावश्‍यक आहे. कनिष्ठ सहायकासाठी (ज्युनियर असोसिएट्‌स - कस्टमर सपोर्ट अँड सेल्स) कोणत्याही शाखेतील पदवी तर कनिष्ठ कृषिसहायकासाठी कृषीतील पदवी आवश्‍यक आहे. पदवीच्या अंतिम सेमिस्टरला अथवा वर्षाला असलेले विद्यार्थी अर्ज करण्यास पात्र आहेत. तथापि, अंतिम निवडीच्या वेळी पदवी उत्तीर्ण प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक राहील.

संरक्षण क्षेत्रात भारताला अमेरिकेकडून सहकार्य



संरक्षण क्षेत्रामध्ये भारताबरोबर अतिशय जवळचे आणि मजबूत संबंध निर्माण करण्याची अमेरिकेची इच्छा असल्याची प्रतिक्रिया अमेरिकेचे संरक्षणमंत्री ऍश्‍टन कार्टर यांनी गुरुवार, 7 एप्रिल 2016 रोजी वॉशिंग्टनमधील सेंटर फॉर स्ट्रॅटेजिक अँड इंटरनॅशनल स्टडीज (सीएसआयएस) मध्ये आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमावेळी दिली. कार्टर हे लवकरच भारताचा दौरा करणार असून, या दौऱ्यावेळी भारत-अमेरिका यांच्यातील द्विपक्षीय संबंधांना चालना देण्यासाठी मोठी घोषणा करण्यात येणार असल्याचेही अमेरिकेकडून स्पष्ट करण्यात आले. 

प्रमुख बॅंकांकडून व्याजदर कपात

मुंबई - रिझर्व्ह बॅंकेने रेपो दरात कपात केल्यानंतर आणि व्याजदरांबाबतच्या आकडेमोडीची नवीन यंत्रणा सुरू केल्यानंतर बॅंकांनी व्याजदर कपात सुरू केली आहे. स्टेट बॅंकेने आपले गृहकर्जांचे दर 0.10 टक्‍क्‍याने कमी करून 9.45 टक्‍क्‍यांपर्यंत आणले आहेत. महिला कर्जदार असल्यास हाच दर 9.40 टक्के इतका झाला आहे. नवीन दर एक एप्रिलपासून लागू झाले आहेत. बॅंकेने आपल्या वेबसाइटवर ही माहिती प्रसिद्ध केली आहे. आयसीआयसीआय बॅंकेचे गृहकर्जही स्टेट बॅंकेइतक्‍याच दराने उपलब्ध होणार आहे. मात्र, पाच कोटी रुपयांपुढील गृहकर्जासाठी 9.65 टक्के व्याजदर असेल.

- - पीटीआय