Pages

पेज

मंगळवार, १६ जून, २०१५

एक हुद्द एक निवृत्तीवेतन: माजी सैनिकांच्या उपोषणाला सुरवात

नवी दिल्ली - "वन रॅंक वन पेन्शन‘ योजनेची अंमलबजावणी करण्याच्या मागणीसाठी माजी सैनिकांनी आज देशभरात उपोषणाला सुरवात केली. राजधानी दिल्लीमध्ये जालंधरमधील 55 माजी सैनिकांच्या गटाने जंतर मंतरवर उपोषणाला सुरवात केली.

"वन रॅंक वन पेन्शन‘ या मुद्द्यामध्ये राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी लक्ष घालावे, अशीही माजी सैनिकांची विनंती आहे. आज देशभरातील विविध शहरांमध्ये उपोषणला सुरवात झाली असून आमची मागणी पूर्ण होईपर्यंत ते सुरूच राहील, असे कर्नल अनिल कौल (निवृत्त) यांनी सांगितले.

माजी सैनिकांना दिलेली सर्व आश्‍वासने पूर्ण केली जातील आणि त्यांनी थोडा संयम बाळगावा, असे आवाहन संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांनी आधीच केले आहे.

[पीटीआय]

सोमवार, १५ जून, २०१५

माजी सैनिकांची देशभर निदर्शने

नवी दिल्ली - "वन रॅंक, वन पेन्शन‘ धोरणाची अंमलबजावणी करण्यासाठी केंद्र सरकार उशीर करत असल्याच्या विरोधात निवृत्त लष्करी अधिकारी व सैनिकांनी आज देशभर निदर्शने केली. केंद्र सरकारने या धोरणाची त्वरित अंमलबजावणी करावी, अशी मागणी करत माजी सैनिकांनी उद्या (ता. 15) पासून साखळी उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. पंजाब, कर्नाटक, केरळ, तमिळनाडू, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश आणि इतर राज्यांतील सुमारे 50 शहरांमध्ये माजी सैनिकांनी निदर्शने केली. 

देशभरात अनेक ठिकाणी आज माजी सैनिकांनी "वन रॅंक, वन पेन्शन‘ लागू करावी, या मागणीसाठी निदर्शने केली. राजधानी दिल्लीत "जंतर-मंतर‘वर आयोजित करण्यात आलेल्या निदर्शनांमध्ये मोठ्या प्रमाणात माजी सैनिकांनी सहभागी झाले होते. सरकारबरोबर अधिकृत पातळीवर आणि मागील दाराने सुरू असलेल्या चर्चेला यश न मिळाल्यामुळे माजी सैनिकांनी निदर्शने करण्याचा निर्णय घेतला. अनेक वर्षांपासून माजी सैनिक ही मागणी करत आहेत.
"वन रॅंक, वन पेन्शन‘ धोरणाची अंमलबजावणी कधी होईल याबाबत ठोस आश्‍वासन सरकारकडून देण्यात आले नाही, त्यामुळे माजी सैनिकांच्या देशव्यापी संघटनेने (आयईएसएम) निदर्शने करण्याचा निर्णय घेतला. ""या धोरणाची अंमलबजावणी करण्याचे आश्‍वासन पंतप्रधान मोदींनी दिले होते, मात्र त्यास एक वर्ष उलटून गेले आहे,‘‘ असे आयईएसएमचे माध्यम सल्लागार कर्नल (निवृत्त) अनिल कौल यांनी सांगितले. "वन रॅंक, वन पेन्शन‘ लागू होत नाही, तोपर्यंत माजी सैनिकांचे आंदोलन सुरूच राहणार असल्याचे आयईएसएमचे उपाध्यक्ष मेजर जनरल (निवृत्त) सतबीर सिंग यांनी स्पष्ट केले. याप्रकरणी आपली बाजू मांडण्यासाठी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची भेट घेण्यात येणार असल्याचेही या वेळी सांगण्यात आले. माजी सैनिकांनी लोकसभा निवडणुकीवेळी भाजपचा प्रचार केला होता. त्यामुळे सत्तेवर आल्यानंतर मोदींनी दिलेले वचन पूर्ण करावे, अशी मागणी माजी सैनिकांच्या एका संघटनेतर्फे या वेळी करण्यात आली.

"जय जवान, जय किसान‘चा नारा
"जंतर-मंतर‘वरील आजच्या निदर्शनामध्ये शेतकऱ्यांचे काही गट आणि दिल्ली विद्यापीठ व जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचे विद्यार्थीही सहभागी झाले होते हे विशेष! प्रचारामध्ये निदर्शनस्थळी शेतकऱ्यांचे आगमन होताच "जय जवान, जय किसान‘च्या घोषणा देण्यात आल्या.

आकडे बोलतात...
"वन रॅंक, वन पेन्शन‘चे लाभार्थी
- 22 लाख - माजी सैनिक
- 6 लाख - वीर पत्नी

आम्ही दिलेली सर्व आश्‍वासने पूर्ण करू, मात्र काही लोकांनी थोडा संयम बाळगण्याची गरज आहे.
- मनोहर पर्रीकर, संरक्षणमंत्री
[पीटीआय]

रविवार, १४ जून, २०१५

एक हुद्द एक निवृत्तीवेतन : मागणीसाठीच्या आंदोलनास विरोध

 लुधियाना - "वन रॅंक, वन पेन्शन‘च्या मागणीसाठी देशभरातील निवृत्त लष्करी अधिकाऱ्यांच्या संघटनांनी देश पातळीवर आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान लुधियानामधील "एक्‍स-सर्व्हिसमॅन थिंकर्स फोरम‘ या संघटनेने या आंदोलनात सहभाग घेणार नसल्याचे जाहीर केले आहे.

या संघटनेने केवळ दिल्ली येथीलच नव्हे तर देशभरात विविध ठिकाणी होणाऱ्या आंदोलनातही सहभागी होणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. येत्या रविवारी देशभरातील निवृत्तांच्या विविध संघटनांचे 8 हजार अधिकारी दिल्लीत जंतरमंतर येथे "वन रॅंक, वन पेन्शन‘च्या मागणीसाठी आंदोलन करणार आहेत. "हा प्रकार लष्कराच्या संस्कृतीविरूद्ध तसेच सेवानियमांविरूद्ध आहे‘ अशा प्रतिक्रिया एक्‍स-सर्व्हिसमेन थिंकर्स फोरमचे अध्यक्ष कर्नल के. ख्रिस्तोफर यांनी दिल्या आहेत. ते पुढे म्हणाले की, सरकार निधीअभावी "वन रॅंक, वन पेन्शन‘ची अंमलबजावणी करण्यास उशीर करत आहे. तसेच तीन हप्त्यांची योजना आहे. त्यामध्ये पहिला जवानांसाठी दुसरा कनिष्ठ अधिकारी (जेसीओ) तर तिसरा अधिकाऱ्यांसाठी असा प्रस्ताव केंद्र सरकारकडे आहे.

रविवार, ७ जून, २०१५

निदर्शने करण्याचा माजी सैनिकांचा इशारा

नवी दिल्ली - ‘वन रॅंक वन पेन्शन‘संदर्भात संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांच्याबरोबर आज झालेली चर्चा निष्फळ ठरल्याने 14 जूनपासून निदर्शने करण्याचा विचार निवृत्त सैनिकांच्या शिष्टमंडळाने व्यक्त केला आहे. मेजर जनरल सतबीर सिंग (निवृत्त) यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने पर्रीकर यांची भेट घेऊन "वन रॅंक वन पेन्शन‘ लवकरात लवकर लागू करण्याची विनंती आज केली.

या योजनेची अंमलबजावणी होण्याची खात्री आणि ती अमलात आणण्यासाठी लागणारा कालावधी सरकारने जाहीर करावा, अशी मागणी या शिष्टमंडळाने केली होती. आज बैठकीत कोणतेही ठोस आश्‍वासन पर्रीकरांनी दिले नसल्याने पुन्हा एकदा त्यांची भेट घेणार असल्याचे सिंग यांनी सांगितले. यानंतरही मार्ग न निघाल्यास 14 जूनपासून निदर्शने आणि उपोषणाचा मार्ग स्वीकारणार असल्याचे ते म्हणाले. 
 
[यूएनआय]